आदर्श विद्यालय आंबवडे ची स्वच्छता मोहीम
पैजारवाडी प्रतिनिधी:-
घनकचरा आणि प्लास्टिक मूळे पर्यावरणाची होणारी हानी लक्षात घेऊन, आदर्श विद्यालय आंबवडे (ता.पन्हाळा) येथील विद्यार्थ्यांनी, बोरपाडळे घाट स्वच्छ करण्याची मोहीम राबवली.
आंबवडे ते बोरपाडळे दरम्यान तीन कि.मी.घाट रस्त्याची व बोरपाडळे बस स्टॉप परिसराची स्वच्छता करून, रस्त्याच्या कडेला पडलेल्या दोन ट्रॉली प्लास्टिक पिशव्या व अर्धा डझन पोती शीतपेय व दारूच्या बाटल्या जमा करण्यात आल्या.
या शिवाय रस्त्या कडेला नाल्यामध्ये खराब कपड्याची बोचकी, व्यापाराची खराब व सुकलेल्या भाज्या, दवाखान्यातील टाकाऊ कचरा, काचा, ओपन बारचे प्लास्टिक ग्लास, असा पर्यावरणाला हानिकारक वस्तू मोठ्या प्रमाणात आढळून आल्या, हा सर्व कचरा मोठ्या खड्यामध्ये एकत्र करून बुजवण्यात आला.
या स्वच्छता मोहिमेत विद्यालयाचे सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापक संभाजी जाधव, शिक्षक संजय मगदूम, संजय मोरे, एकनाथ पोवार, सुशिला यादव, अमित शिपुगडे, सुभाष पाटील, भिकाजी जाधव, समाधान कांबळे हे सहभागी झाले होते.
असंख्य कारणास्तव जलद गतीने ऱ्हास होत असलेल्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपापल्या कचऱ्याची काळजी पूर्वक विल्हेवाट लावली पाहिजे. सार्वजनिक व ऐतिहासीक ठिकाण हे स्वतःचे घर समजून, स्वच्छता ठेवली पाहिजे. सर्वांनी कचरा कुंडीचा वापर करावा, ओपन बार तळीरामानी मध्यपान करून काचेच्या बाटल्या रस्त्यावर फोडू नयेत. असे मत आदर्श शिक्षक व पर्यावरण अभ्यासक श्री.संजय मगदूम यांनी व्यक्त केले.