थेरगाव च्या “अंजनाई ” दुध संस्थेची खऱ्या अर्थाने धवल क्रांती
बांबवडे : थेरगाव तालुका शाहुवाडी इथं खऱ्या अर्थाने दुधाची धवलक्रांती घडत आहे. येथील एका तरुणाने एका दुध संस्थेच्या माध्यमातून गावात व्यावसायिक समृद्धी आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. त्या तरुणाचे नाव आहे,अनिल कृष्णात पाटील.
श्रीदेवी अंजनाई महिला सहकारी दुध संस्थेच्या माध्यमातून सुरु केलेला आपला प्रवास आता व्यावसायिक जगाच्या उंबरठ्यापर्यंत आला आहे. या प्रवासात त्यांना त्यांची पत्नी सौ जयश्री पाटील व त्यांच्या संचालक मंडळ, तसेच सभासद वर्गाची उत्तम साथ लाभली आहे. याचबरोबर गोकुळ दुध संघाने देखील मोलाचे सहकार्य केल्याचे अनिल पाटील सांगतात. यांनी या महिला दुध संस्थेसोबत ज्योतिर्लिंग सह. दुध संस्थेची देखील निर्मिती केली आहे.
श्रीदेवी अंजनाई दुध संस्थेचे प्रती दिन दुधाचे संकलन मोठ्या प्रमाणावर होत असताना, या संस्थेने स्वतःच्या मालकीची इमारत उभी केली आहे. तसेच या संस्थेमध्ये आधुनिक यंत्र सामुग्री बसवली असून, सुमारे ३००० लिटर गायीचे , व २००० लिटर म्हैशीच्या दुधाचे संकलन करण्याची क्षमता असल्याच्या टाक्या बसवल्या आहेत.एकूण सुमारे ५००० लिटर क्षमतेचे दुध शीतकरण केंद्र थेरगाव इथ उभे रहात आहे.
हि संस्था दुध उत्पादकाला इतरांपेक्षा ५० पैसे अधिक प्रती लिटर दर देत आहे. येणाऱ्या कोणत्याही सणाला उत्पादकाला श्रीखंड भेट म्हणून देते. तसेच दिवाळी ला फरक बिलाचेही वाटप होते. उत्पादकाला केंद्रबिंदू मानून संस्थेचे सर्वेसर्वा असलेले अनिल पाटील यांनी संस्थेच्या मालकीचे दुध शीतकरण केंद्र निर्माण करून जिल्ह्यात आपल्या गावाचे नाव आधुनिकतेच्या यादीत नोंदवले आहे.