निळे जवळील अपघातात मोटरसायकल व ट्रॅक्टर यांच्या धडकेत दोघेजण जागीच ठार
मलकापूर प्रतिनिधी :
कोल्हापूर – रत्नागिरी महामार्गावरील करूगंळे फाट्यानजीक, निळे तालुका शाहुवाडी गावच्या हद्दीत मोटरसायकल ट्रॅक्टर चा अपघात झाल्याने दोघांना जागीच आपला जीव गमवावा लागला आहे. हिरो पॅशन प्रो वरील मोटरसायकलस्वार हे ट्रॅक्टर ट्रॉली ला धडकून झालेल्या अपघातात शहाजी बापू गुजर (वय 40 वर्षे ) रा.माजगाव पैकी माळवाडी तालुका पन्हाळा व सुदाम शंकर गोताळ वय 40 वर्षे )रा.मेढे गोताळवाडी तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी हे दोन युवक जागीच ठार झाल्याची नोंद, शाहुवाडी पोलीसांत झाली आहे .
पोलीस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन्ही युवक मोटर सायकलवरून रत्नागिरीहुन कोल्हापूरकडे निघाले होते. तर ट्रॅक्टर हा मलकापूरहून आंबा गावाकडे जात होता. करूगंळे फाट्या नजीक निळे गावच्या हद्दीत स्मशान भूमीच्या वळणावर, भरधाव वेगाने निघालेल्या मोटरसायकलस्वाराची ट्रॅक्टर ट्रॉली ला जोराची धडक बसली. यात मोटर सायकल वरील शहाजी गुजर व सुदाम गोताळ यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्त स्त्राव झाला होता. यात या दोन्ही युवकांच्यां डोक्याला जबर मार लागल्याने, दोघांचाही जागीच मृत्यू झाला .
अपघाताची बातमी समजताच, घटनास्थळी पोलीस निरीक्षक अनिल गाडे , पोलिस उपनिरिक्षक श्री यम्मेवार व पोलीस यांनी तातडीने भेट देवून पंचनामा करून, दोन्ही मृतदेह मलकापूर ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. यावेळी इथं बघ्यांची गर्दी झाली होती. तातडीने १०८ रूग्णवाहिकेचे डॉ. सचिन शिंदे व अजय पाटील हे घटनास्थळी दाखल झाले. मात्र दोन्ही युवकांचा जागीच मृत्यू झाल्याने, पंचनामा करून, दोन्ही मृतदेह मलकापूर ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आले..
====वाहतुकीची गर्दी आणि नागरीकांची वर्दळ===
महाशिवरात्री मुळे शाहुवाडी तालुक्यातील धोपेश्वर येथील यात्रा तसेच मार्लेश्वर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गर्दी या मुळे कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर आज वाहनांची गर्दी जास्त होती.
==बेदरकार वाहनधारकाना लगाम बसणार का ?
कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर भरधाव वेग आणि बेदरकार वाहन चालक या मुळे अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. त्या मुळे अशा बेदरकार वाहन धारकाना लगाम बसणार का ? हा प्रश्न घटनेमुळे पुढे येवू लागला आहे.
=====दोन महीन्यात आकरा ठार ====
कोल्हापूर- रत्नागिरी या महामार्गावर मलकापूर ते आंबा या मार्गावर जयसिंगपूर येथील दोन युवक, पुणे येथील दोन कुटुंबातील सहा जण, मलकापूर येथील शाळी नदी नाक्याजवळ एक तर आज (मंगळवारी) करूंगंळे फाट्या जवळ दोन अशा आकरा जणांचा या कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर अपघात झाला आहे. .
====आणि त्या अपघाताची आठवण व घबराट==
कोल्हापूर – रत्नागिरी मार्गावरील निळे गावच्या हद्दीत करूगंळे फाट्यावर झालेल्या अपघाताची बातमी समजताच, शाहुवाडी पंचक्रोशीत भितीचे वातावरण पसरले होते. कारण गेल्या वर्षी महाशिवरात्री दिवशीच धोपेश्वर यात्रे दिवशी अपघात झाला होता. या मुळे या अपघाताची बातमी समजताच सर्वत्र घबराट पसरली होती.
दरम्यान रात्री उशिरा दोन्ही मृतदेह शवविच्छेदन करून नाते वाईकांच्या ताब्यात देण्यात आले.