कडेगाव चे पै.अविनाश गायकवाड यांचा अपघाती मृत्यू
शिराळा ता.१३ : कडेगाव तालुक्यातील वांगी येथे झालेल्या अपघातात फुफिरे (ता.शिराळा) येथील पै.अविनाश गायकवाड (२१ वर्षे ) यांच्या मृत्यूने शिराळा तालुक्यातील कुस्ती शौकीनांच्यावर शोककळा पसरली आहे. एकुलत्या एका मुलाच्या या दुर्दैवी मृत्यूने गायकवाड कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांनी मनमिळाऊ स्वभाव व लहानपणा पासून आवड असलेल्या आपल्या कुस्तीच्या कलेने अल्पावधीतच परिसरातील अनेक मैदाने गाजवून आपला वेगळा ठसा उमटवला होता. शालेय कुस्ती स्पर्धेत दोनदा नॅशनल पदक मिळवून फुफिरेतील काळेश्वर केसरीची गदा पटकावली होती. त्यास लहानपणा पासुन कुस्तीची आवड होती. त्याचे प्राथमिक शिक्षण फुफिरे, माध्यमिक पुनवत येथे झाले. सध्या तो शिव शाहू विद्यालय सरूड (ता.शाहूवाडी) येथे बी.ए.भाग दोन मध्ये शिकत होता. कोल्हापूर येथील न्यू मोतीबाग तालमीत सराव करत होता. एक महिन्यापूर्वी कुंडल येथील क्रांती कुस्ती संकुलात सरावा साठी दाखल झाला होता. त्यांच्या या अकस्मात निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
त्याच्या पश्चात आई, वडील, एक बहीण असा परिवार आहे. त्यांच्यावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी त्यांचे पैलवान सहकारी व कुस्ती शौकीनांच्यावर शोक अनावर झाला होता.