पन्हाळा तालुक्यातील जुने पारगाव च्या मयूर सिद वर चाकू हल्ला
पन्हाळा प्रतिनिधी:-
पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी येथे आर्थिक वादातून एकावर खुनी हल्ला झाला आहे. हातकणंगले तालुक्यातील जुने पारगाव येथील मयूर रंगराव सिद, हा पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी येथे मित्राच्या वडिलांच्या रक्षाविसर्जनासाठी गेला होता. तिथं त्याच्यावर हातकणंगले तालुक्यातील घूणकी येथील ऋषिकेश धर्मे या तरुणाने प्राण घातक हल्ला केला. यामध्ये मयूर सिद गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर वारणानगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जुने पारगाव येथील मयूर सिद हा २३ वर्षीय तरुण, त्याच्या मित्राच्या वडिलांच्या रक्षाविसर्जन साठी बहिरेवाडी इथं गेला होता. सकाळी साधारणपणे १० वाजता तिथं ऋषिकेश धर्में, त्याचा मित्र अविनाश साठे याच्यासोबत आला. तिथं ऋषिकेशने मयूर ला बाजूला बोलावून पैशाची मागणी केली. मयूर ने पैसे देण्यास नकार दिल्यावर, त्याच्यावर ऋषीकेशने चाकूने वार केला, आणि तिथून पळून गेला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मयूरला त्याच्या मित्रांनी वारणानगर येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.
दरम्यान मयूर ची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे डॉ. महादेव पाटील यांनी सांगितले आहे.
या बाबत कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, हा प्रकार आर्थिक देवाण घेवाण मधून झाला असल्याचे, पोलिसांनी सांगितले आहे. पण ती रकम किती आहे, याबाबत सविस्तर माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.
या घटनेत मयूरच्या पोटात धारदार शस्त्राचा वार झाला असून, छातीवर ही किरकोळ जखम झाली आहे. मयूर वारणा महाविद्यालयाचा विद्यार्थी असून, त्याला पहाण्यासाठी त्याच्या मित्रांनी हॉस्पिटल परिसरात मोठी गर्दी केली होती.