‘ दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, ‘ आणि ‘ ओम दत्त चिले ओम ‘ च्या गजरात दत्तजयंती संपन्न
पैजारवाडी प्रतिनिधी:- कृष्णात हिरवे
‘ दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, ‘ आणि ‘ ओम दत्त चिले ओम ‘ च्या गजरात हजारो भक्तांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र पैजारवाडी (ता.पन्हाळा) येथे नऊ दिवस चालू असलेल्या दत्तजयंती उत्सवाची अपार उत्साहात सांगता झाली.
श्री क्षेत्र पैजारवाडी येथील कासावाकृती ‘ परमपूज्य सद्गुरू श्री चिले महाराज ‘ समाधी मंदिरात सालाबाद प्रमाणे दत्तजयंती उत्सवानिमित्य नवरात्र कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमा बरोबरच रोज पहाटे काकड आरती, सकाळी श्री ना अभिषेक, ग्रंथवाचन, त्रिकाल आरती, रात्री भजन, कीर्तन, प्रवचन असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या काळात कासावाकृती मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पहाटे मंदिरा मध्ये काकड आरती झालेनंतर महाभिषेक पार पडला. दिवसभर भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. नृसिंहवाडी ते पैजारवाडी या पायी पालखीचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत झाले नंतर, सायंकाळी श्री जन्मकाळ सोहळा साजरा करणेत आला. यावेळी परिसरातील महिलांनी व भाविकांनी मोठी गर्दी केली होती. प.पु.सद्गुरू चिले महाराज समाधी मंदिर ट्रस्ट अध्यक्ष बाबासाहेब चव्हाण, शाहुवाडी विभागाचे पोलीस उपअधीक्षक आर.आर.पाटील यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.
यावेळी ट्रस्टचे विश्वस्त बाबुराव गराडे, बी.के. घोसाळकर (गुरुजी), चंद्रप्रकाश खुटाळे, बापूजी यादव उपस्थित होते. हरी जागरणाने दत्तजयंती उत्सवाची सांगता झाली. यावेळी बोरपाडळे आरोग्य उपकेंद्र तर्फे आरोग्य पथक तैनात करण्यात आले होते तर कोडोली, पन्हाळा व शाहूवाडी पोलिसांनी उत्सव काळात चोख बंदोबस्त ठेवला होता. हा उत्सव पूर्णत्वास नेण्यासाठी सद्गुरू चिले महाराज समाधी मंदिर ट्रस्ट,पैजारवाडी येथील सर्व तरुणा मंडळे, ग्रामस्थ, तसेच परिसरातील शाळांतील विद्यार्थ्यांनी व भक्तांनी परिश्रम घेतले.