कोल्हापूर – मलकापूर मार्गावर पैजारवाडी येथील खड्डा बनतोय मृत्यूचा सापळा
पैजारवाडी प्रतिनिधी :
मोठ्या खड्यामुळे पाच दिवसात दुचाकी चे ११ अपघात, यात सात जण किरकोळ तर दोघे जण गंभीर जखमी
२६ जानेवारी रोजी शिवाजी पुलावर झालेल्या मोठ्या अपघातामुळे पुलावरून हलक्या व अवजडचार चाकी वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली. पर्यायी प्रवासी या मार्गावर दुचाकी वाहनानी प्रवास करू लागल्याने मलकापूर-कोल्हापूर मार्गावर दुचाकी वाहनाची मोठी वर्दळ वाढली. परंतु कोल्हापूर-मलकापूर मार्गावर पैजारवाडी-आवळीच्या सीमेलगतचे वळण संपल्यावर तब्बल ८ फूट लांबीचा ४ फूट रुंदी तर ६ इंच खोलीचा मोठा खड्डा पडला आहे. अशा अवस्थेत यातुनच अवजड वाहने कशीबशी मार्गस्थ होत आहेत. दुचाकी वाहनांना मोठी कसरत करावी लागत आहे. रात्रीच्यावेळी अचानक समोर येणाऱ्या या खड्यामुळे दुचाकी स्लिप होऊन,चालकाचा ताबा सुटून तसेच दुचाकीवर मागे बसलेल्या प्रवाशांचा तोल जाऊन अशा प्रकारचे छोटे मोठे ११ आपघात झाले. यामध्ये दोघे जण गंभीर तर सात जण किरकोळ जखमी झाले आहेत
हे अपघात किरकोळ स्वरूपाचे असल्याने कोणीही याची नोंद अगर दखल घेतलेली नाही. पण वाहन चालकांना सावध करण्यासाठी पैजारवाडीतील होतकरु तरुणांनी या खड्या भोवती पांढऱ्या रंगाचा पट्टा मारून प्रवाशांप्रती माणुसकी जपली आहे.
परंतु संबंधित खाते व अधिकारी याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत प्रवाशांच्या जीवाशी खेळत असल्याने, प्रवासी वर्गातून नाराजी व संताप व्यक्त होत आहे.
एखादा मोठा अपघात होऊन, अनेकांचे बळी गेल्यावरच प्रशासन डोळे उघडणार की काय..? असा संतप्त सवाल नागरिकांच्यातून करण्यात येत आहे.
संबंधित खात्याकडून हा खड्डा त्वरीत भरून रस्ता दुरुस्त करण्यात यावा, अन्यथा कोल्हापूर-मलकापूर मार्गावर पडलेल्या खड्यामध्ये वृक्षारोपण आणि रास्ता रोको अशी आंदोलन करणाचा इशारा प्रवासी , स्थानिक नागरिक व पन्हाळा मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.