शाहुवाडी तालुक्यातील ‘ खाकी वर्दी ‘ बनली मायेची ऊब : श्री. पी.आर.पाटील
चंद्रकांत मुदुगाडे ( विशेष ): कोल्हापूर, सांगली जिल्हा पोलीस दलातील अलीकडच्या काही अनुचित घटनांमुळे निष्ठुरतेची आख्यायिका बनून अख्खे पोलीस खाते बदनामीचे हेलकावे खात असतानाच, खात्याच्या शब्दकोषात अपवादानेही न सापडणारी दया किंवा करुणा हि उपाधी जर का याच वर्दीतील तेही वरिष्ठ अधिकारी माणसाला लागू पडत असेल,तर विश्वास गमावण्याची पातळी ओलांडणाऱ्या पोलीस दलाची मान नक्कीच अभिमानाने उंचावायला हवी. एरवी रस्त्यावरचे जगणे वाट्याला येणाऱ्यांप्रती अपवाद वगळता निव्वळ ‘ चुक..चुक ‘ णारी सहानुभूती व्यक्त होत असल्याचे निदर्शनास येत असताना, सद्या नागपूर मध्ये रात्रीच्या ऐन थंडीत एक कोल्हापुरवासी वर्दीतील अधिकारी अशा उपेक्षितांच्या अंगाखांद्यावर मायेची चादर पांघरूण पोलीसांप्रती सामान्यांच्या मनामध्ये आपलेपणाची ज्योत प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. सोशल मिडिया सह प्रसार माध्यमांमध्ये या अधिकाऱ्याचे होत असलेले कौतुक चर्चेचा विषय ठरले आहे. नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील हेच त्या खाकी वर्दीतील करुणासागर अधिकाऱ्याचे नांव .
कोल्हापूर जिल्ह्यातील सरूड ( तालुका शाहुवाडी ) गावचे रहिवासी असणारे पी.आर. पाटील हे अलीकडेच नागपूर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत झाले आहेत. नागपूर जसे ‘ क्राईम रेट ‘ मध्ये आघाडीवर तसेच ते येथील कडाक्याच्या थंडीसाठीही प्रसिद्ध आहे. या शहरातील रस्त्यांवर दिवसभराची वेठबिगारी करून दमलेले अनेक जीव रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला अर्धवट बिछान्यात कुड कुडत पहुडल्याचे येथे गस्त दरम्यान ‘ पी.आर.’ यांच्या निदर्शनास आले. शालेय जीवनात गरिबी जवळून अनुभवल्यामुळे अशा गरीब गरजूंची निकड नेहमीच अस्वस्थ करत आल्याने थंडीत ऊबदार ठरणाऱ्या ब्लँकेट, चादरी, खरेदी केलेल्या सहृदय अधिकाऱ्याने आपल्या सहकाऱ्यांना सोबतीला घेवून थंडीत पहुडलेल्या अशा अनेक शरीरांवर पांघरूण घालण्याची रात्रभर मोहीमच उघडली.
पी.आर.पाटील यांनी खात्यातील कर्मचारी सहकाऱ्यांबरोबरच मित्रांच्या माध्यमातून आपापल्या परीने जमलेल्या पैशातून टप्प्या टप्प्याने खरेदी केलेले हे ऊबदार कपडे व साहित्य गेल्या काही दिवसांपासून रस्त्याकडेला, मंदिरांमध्ये कडाक्याच्या थंडीत झोपलेल्या वृद्ध किंवा तत्सम घटकांना पुरविण्याचा आदर्शवत उपक्रम सुरु केला आहे. मागील आठवड्यात गावी आल्यानंतरही त्यांनी स्थानिक मित्रांना बरोबर घेवून परिसरातील गरजूंना या उपक्रमातून मायेचा हात दिला आहे. थंडी सुरु झाल्यापासून त्यांनी शंभरांवर गरजूंना अशी ऊबदार मदत केली आहे. तर प्रत्येक दिवाळीच्या वेळी ते गरीब, अपंग, उपेक्षित, शहीद जवान अशा कुटुंबियांना फराळाचे साहित्य स्वतः पोहोच करून दिवाळी सण साजरा करताना दिसतात. यासाठी त्यांनी गावाकडे ‘ विश्वास फौंडेशन ‘ ची स्थापना केली आहे.
कर्तव्य आणि सामाजिक भान यांची सांगड घालून सेवेत कार्यरत असलेले पी.आर.पाटील हे किमयागार चित्रकार म्हणूनही पोलीस दलात सुपरिचित आहेत. आजपर्यंत त्यांच्या कुंचल्यातून अनेक चिमणी पाखरांसह निसर्गाचीत्रांबरोबरच हुबेहूब व्यक्तिचित्रे रेखाटली गेली आहेत. विशेषतः प्रसिद्धीसाठी काहीतरी करावे, अशा विचारांचे ‘ पी.आर.’ हे समर्थक नाहीत, हेही येथे मुद्दाम नमूद करायला हवे.