कोपार्डे च्या मैदानावर पैलवान बाला रफिक चा गदालोट डावावर विजय
मलकापूर (प्रतिनिधी) संतोष कुंभार यांजकडून
कोपार्डे तालुका शाहुवाडी येथे भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या निकाली कुस्तीच्या जंगी मैदानात, प्रथम क्रमांकाच्या लढतीत न्यू मोती बाग तालीम कोल्हापूरच्या पै. बाला रफिकने पैलवान सुरज निकम याच्या वर गदालोट डावावर विजय मिळविला. तर स्थानिक मल्लांनी ही चटकदार कुस्ती करून, कुस्ती शौकीनांची वाहवा मिळवली.
भैरवनाथ देवाच्या यात्रे निमित्त आयोजित कुस्ती मैदानाच उदघाटन माजी नगराध्यक्ष शामराव कारंडे यांच्या हस्ते आणि सरंपच मारूती चौगुले यांच्या सह विजय कारंडे, बाजीराव कळंत्रे व यात्रा कमिटीच्या मान्यवरांचे उपस्थितीत करण्यात आले.
या मैदानात नंबर एकची लढत न्यू मोती बाग तालीम कोल्हापूरचा पैलवान बाला रफीक आणि पै.रोहीत पटेल यांचा पठ्ठा पै. सुरज निकम यांच्यात झाली. प्रारंभी दोघांनीही आक्रमक खेळ करून डाव प्रतिडाव टाकले. सुरज निकम ने आक्रमक डाव टाकून कुस्ती वर ताबा मिळविला होता. मात्र अखेर दहाव्या मिनिटाला पैलवान बाला रफिकने गदा लोट डावावर विजय मिळविला. या कुस्तीला पंच म्हणून पोलीस निरीक्षक बाजीराव पाटील आणि विजय कारंडे हे होते.
नंबर दोनची लढत उपमहाराष्ट्र केसरी नंदु अबदार आणि शिवाजी पाटील वारणा कापशी यांच्यात झाली. दोघांनी ही आपली ताकत आजमवण्याचा प्रयत्न करून डाव टाकून कुस्ती वर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. अखेर सातव्या मिनिटाला नंदु आबदारने ढाक डावावर शिवाजी पाटील वर विजय मिळविला. या कुस्तीला पंच म्हणून ऑलंपिकवीर बंडा पाटील रेठरेकर हे होते.
तीन नंबरची लढत पैलवान राजाराम यमगर आणि पैलवान सरदार सावंत यांच्यात झाली. बराच वेळ चाललेली ही लढत अखेर गुणावर घेण्यात आली. यात सरदार सावंत विजयी झाला. कुस्तीला पंच म्हणून उपमहाराष्ट्र केसरी संपत जाधव होते.
पैलवान अजित पाटील सावे आणि पैलवान विठ्ठल कारंडे कापशी यांच्यातील लढत बरोबरीत सोडवण्यात आली. कुस्तीला पंच म्हणून सर्जेराव पाटील हे होते. तर शाहुवाडी केसरी अभिजित भोसले आणि विकास पाटील यांची कुस्ती ही बरोबरीत सोडवण्यात आली. पंच म्हणून हिंदूराव आळवेकर उपस्थित होते.
या प्रमुख कुस्त्या बरोबर च महेश पाटील निनाई परळे, तुषार आरंडे, सुशांत आरंडे, प्रताप माने, सुनिल चौगुले, कोपार्डे, राहुल धोत्रे ओम भोपळे पेरीड, अविनाश पाटील, करण पाटील, ओंकार कारंडे, रोहित पाटील, वैभव चौगुले कोपार्डे ,बाजीराव माने वाकुर्ड बु, विशाल माने ,कार्तीक पाटील माणगाव , ओंकार पाटील, विकास मोरबाळे, प्रमोद गुरव, सुरज केसरे , साई कदम, त्रृशीकेश भरणकर या मल्लानी निकाली कुस्त्या केल्या.
मैदानात पंच म्हणून बाळू पाटील, आनंदा चौगुले, मारूती चौगुले, सचिन वारकरी, बाबाजी वारकरी, तानाजी कारंडे , दिनेश झाडगे ,रमेश माने, सुभाष आरंडे, आनंदा कळंत्रे, भगवान मोरे, राजेश माने, मारूती चौगुले, वसंत पाटील, रामा साळुंखे, सुभाष घागरे , शंकर चौगुले, रंगराव जामदार, आदिनी काम पाहिले.
या कुस्ती मैदानात राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते राम सारंग, शिवछत्रपती पुरस्कार विजेते वसंत पाटील सोनवडेकर, आदिसह नामांकित वस्ताद, पैलवान कुस्ती शौकीन उपस्थित होते. मैदान यशस्वी करण्यासाठी संयोजक ग्रामपंचायत, भैरोबा ग्रामविकास ट्रस्ट मुंबई, पुणे रहीवासी मंडळ, भिमनगर कोपार्डे आणि ग्रामस्थ, युवक यांनी विशेष परिश्रम घेतले.
कुस्तीचे समालोचन सर्जेराव मोरे आणि आनंदा केसरे, यांनी केले.