शाहुवाडी तालुक्यात ‘ महाराष्ट्र बंद ‘ ला प्रतिसाद
मलकापूर प्रतिनिधी :
भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघ , भारतीय बौध्द महासंघ व इतर आंबेडकरवादी संघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला शाहूवाडी तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील सरूड, बांबवडे, शाहूवाडी, मलकापूर, आंबा, करंजफेण, शित्तूरवारूण या प्रमुख बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी दैनंदिन व्यवहार बंद ठेवत, या बंदला पाठिंबा दिला. आंबेडकरी चळवळीशी निगडीत कार्यकर्त्यांनी अनेक गावांतील प्रमुख मार्गावरून बुधवारी सकाळी निषेध फेरी काढत, व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केले. तर कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील आंबा व बांबवडे या ठिकाणी कार्यकर्त्यांनी काहीकाळ निदर्शने करून रास्ता रोको केला. पोलीस प्रशासनाने हस्तक्षेप केल्यानंतर येथील वातावरण निवळले.
मलकापूर येथील सुभाष चौकात शेकापचे भाई भारत पाटील , भारतीय बौध्द महासंघाचे करूगंळेचे उपसरपंच प्रकाश कांबळे यांनी घटनेचा निषेध केला.
या वेळी अनिल कांबळे, आर एस कांबळे, हणमंत कवळे, राजेंद्र देशमाने यांच्यासह विविध संघटनाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
दरम्यान तालुक्यातील प्रमुख मार्गांवर काही संघटनांनी प्रवासी वाहतुकीला मज्जाव केल्यामुळे, घराबाहेर पडलेल्या अनेक प्रवाशांना रस्त्यात अडकून पडावे लागल्याचे चित्र सर्रास बसस्थानक परिसरात पहायला मिळाले. सकाळी नऊ वाजेपर्यंत सुरू असलेली एसटी बस वाहतूक आंदोलकांचा वाढता प्रतिकार पाहून आगार व्यवस्थापनाने नंतर ही सेवा बंद करताना काही मार्गावरील बस गाड्या माघारी बोलवून घेतल्या. जाणाऱ्या-येणाऱ्या दैनंदिन बसगाड्या जागेवरच थांबविण्याचा निर्णय घेतल्याने मलकापूर आगार परिसरात अनेक बसगाड्या विसावलेल्या दिसल्या. कुठेही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलीस निरीक्षक अनिल गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत पोलिस कर्मचाऱ्यांनी दिवसभर रस्त्यावरील पेट्रोलिंग कायम ठेवत परिस्थिती नियंत्रणात राहिल याची दक्षता घेतली होती.
दरम्यान बंद काळात पोलीस निरीक्षक अनिल गाडे ,तहसिलदार चंद्रशेखर सानप यांनी विविध ठिकाणी भेट दिली.