शिराळ्यात भाजप शासनाविरोधात राष्ट्रवादी चा मोर्चा
शिराळा : भाजप सरकारच्या विरोधात सर्व सामान्य लोकांच्यात असणारा असंतोष दाखविण्यासाठी व शासनाच्या धोरणाने त्रस्त झालेल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिराळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारचा अनागोंदी व जनविरोधी कारभाराचा निषेध म्हणून हल्लाबोल आंदोलन करून शिराळा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चाची सुरुवात कृषी उत्पन्न बाजार समिती येथून करण्यात आली. ” या शासनाचं करायचं काय ,खाली डोकं वर पाय “,अशा घोषणा दिल्या जात होत्या. मोर्चा तहसील कार्यालय समोर नेण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नायब तहसीलदार के.जी. नाईक यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी बोलताना माजी आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले कि, भाजप ची सत्ता येवून तीन वर्षे पूर्ण झाली असली, तरी अद्याप कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. हे शासन घोषणाबाजी व जाहिरातबाजी करून जनतेशी खेळत आहेत. जी.एस.टी. मुळे व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले. उद्योगधंदे बंद पडायला लागले, परिणामी कोट्यावधी युवक बेरोजगार झाले. नोकरी नाहीच, तर असणाऱ्यांच्या नोकऱ्या जायला लागल्या. नोटाबंदी करून छोट्या मोठ्यांची सगळ्यांची वाट लावली. या सरकारला संवेदना नाही. ते बेजबाबदारपणे वागत असून, शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. आज शेतकरी वर्गाला हमीभाव मिळत नाही. युवकांना नोकऱ्या नाहीत.उद्योग-व्यापार बंद होत आहे. गेल्या तीन वर्षात विकास झाला नाही. सरकार मोठ्यांना मोठे करत आहे. शेतकरी वर्ग रस्त्यावर आला आहे. देशाचे तसेच राज्याचे वाटोळे करायला, हे भाजप सरकार निघाले आहे. शिराळा तालुक्यात तर आघाडी सरकारच्या काळात गती घेतलेली वाकुर्डे योजनेची व गिरजवडे एम.आय.टँक ची कामे निधी अभावी बंद पडण्याचे काम या सरकार ने केले असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वागत व प्रास्ताविक विजयराव नलवडे यांनी केले.
यावेळी शिराळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष विजयराव नलवडे ,युवा नेते विराज नाईक, पं.स. सदस्य बाळासाहेब नायकवडी, उपसभापती सम्राटसिंग नाईक, उपनगराध्यक्ष कीर्तीकुमार पाटील, शेतकरी सूतगिरणी चे अध्यक्ष सुरेशराव चव्हाण , माजी सरपंच देवेंद्र पाटील, नगरसेवक विश्वप्रतापसिंग नाईक, नगरसेविका प्रतिभा पवार, सुजाता इंगवले, सुनिता निकम, गौतम पोटे, राष्ट्रवादी च्या महिला तालुकाध्यक्ष रुपाली भोसले, युवक अध्यक्ष राहुल पवार, विद्यार्थी तालुकाध्यक्ष सागर नलवडे, प्रमोद पवार, विश्वास कदम, मंगेश कांबळे, सुनील कवठेकर, महेश गायकवाड, राजू निकम उपस्थित होते.
महिला तालुकाध्यक्षा रुपाली भोसले यांनी आभार मानले.