नवे पारगाव येथील ट्रॅक्टर- मोटारसायकल अपघातात १ ठार,१ जखमी
कोडोली प्रतिनिधी:-
वाठार- कोडोली राज्य मार्गावर नवे पारगाव (ता.हातकणंगले) येथे भरधाव ट्रॅक्टरने तीन वाहनांना जोरदार धड़क दिली. या अपघातात मोटार सायकलस्वार सचिन सर्जेराव पाटील (वय ३२, रा.नवे पारगाव, ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर) हा तरुण जागीच ठार झाला, तर त्याचा भाऊ संतोष हे गंभीर जखमी झाले. अपघात आज दि. ३ फेब्रुवारी, शनिवारी सकाळी साडे नऊ च्या सुमारास झाला. अपघाताची नोंद वडगाव पोलिसात झाली आहे.
या बाबत घटना स्थळ व पोलीसातून मिळालेली माहिती अशी कि, वाठार- कोडोली राज्य मार्गावर नवे पारगाव येथून कोडोलीच्या दिशेने ट्रॅक्टर (क्रमांक नाही) भरधाव जात होता. वारणानगरहून वाठार च्या दिशेने वारणा कारखान्याची महिंद्रा पिक अप (एम.एच.०९ एल.५५६६), कार (एम.एच.०९ डी.ए.४१०३) व मोटर सायकल ( एम.एच.०९ डी.जी.२१५७) एका मागून ही वाहने जात होती. नवे पारगाव येथील महात्मा गांधी हॉस्पिटल जवळ हॉटेल शिवाक्षी समोर भरधाव ट्रॅक्टर ने ओव्हरटेक करताना मोटर सायकलला समोरून जोरदार धडक दिली. मोटर सायकल वरुन सचिन सर्जेराव पाटील, त्यांचा भाऊ संतोष याना तळसंदे येथे घेवुन जात होते. ट्रॅक्टरच्या भीषण धड़केमुळे मोटर सायकल वरील संतोष हे महिंद्रा पिक अपच्या काचेवर जोरात आपटले गेले. त्यांचा उजवा पाय व डावा हात मोडला आहे. तर ट्रॅक्टरच्या खाली सचिन पाटील हे सापडल्यामुळे जागीच ठार झाले.
संतोष सर्जेराव पाटील हे तळसंदे येथील शामराव पाटील आयटीआय मध्ये प्राचार्य म्हणून काम पहातात. सचिन हे सुद्धा सॉफ्टवेअर इंजिनियर होते.
ट्रॅकटरने मोटर सायकलला काही अंतरावर फरफटत नेले. अपघाता नंतर काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली. अपघात स्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी अपघातातील वाहने ताब्यात घेतली. ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन वैद्यकिय अधिकारी बी.एस.लाटवडेकर यानी केले व मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नामदेव मोरे, संतोष वायदंडे, तुकाराम कुंभार अधिक तपास करत आहेत.