कोडोली परिसरात नाताळ उत्साहात
कोडोली वार्ताहर :
कोडोलीसह ता.पन्हाळा परिसरातील माजगाव, पोर्ले तर्फे ठाणे, कामेरी, येलूर, किणी, पेठवडगाव, ऐतवडे खुर्द आणि कुरळप येथे आज नाताळ उत्साहात साजरा झाला. यानिमित्त येथील ख्रिश्चन प्रेस्बिटेरियन चर्चच्या आवाराला आज यात्रेचे स्वरूप आले आहे.
शनिवारी रात्री बारा वाजता चर्चमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. मेणबत्ती पेटवून प्रार्थना झाली. ख्रिस्ती बांधवांनी घरोघरी हा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. केक कापण्यात आले. एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. येथील मुख्य चर्चमध्ये कोडोली व परीसरातील सर्वधर्मीयांनी अर्पण केलेले धान्य, गुळाचे रवे, आदी वस्तुंचा लिलाव रात्री करण्यात आला.’सेव्हंथ डे अडव्हस्टीस्ट चर्च’ मध्ये दान मिळालेले वस्तुंचाही लिलाव झाला.
दरम्यान, सकाळी कोडोलीतील सर्व चर्चमध्ये सामुदायिक प्रार्थना झाली. कागदी पताका, विद्युत रोषणाई, आकाशदिवे आणि ध्वनिक्षेपकावरील गाणी, यामुळे येथील ख्रिस्ती वसाहतीत उत्साहाचे वातावरण होते. मुख्य चर्चमध्ये सकाळी नऊ ते अकरा यावेळेत केसीसी पंथाच्यावतीने रेव्हरंड एस.आर.रनभिसे यांनी भक्ती घेतली. अकरा ते एक या वेळेत कोडोली चर्चचे पालक रेव्हरंड एस.एस.विभूते यांनी संदेश दिला. साखरवाडी चर्चचे पास्टर सुधीर भोसले व येथील ख्रिस्तवासी अजित कडकडे यांच्या घराच्या पटांगणासमोर कोडोली चर्चतर्फे सुर्यकांत गायकवाड यांनी दुपारी दोन वाजता संदेश दिला. त्यांच्या हस्ते विधवा महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. पास्टर सुधीर भोसले यांनी रात्री आठपर्यंत वाळवे तालुक्यातील कुरळप व एतवडे खुर्द येथील चर्चमध्ये भक्ती दिली. ख्रिस्ती बांधवांनी उपासना झाल्यानंतर, अनेकांनी एकमेकांना हस्तांदोलन करीत ‘हैप्पी ख्रिसमस, मेरी ख्रिसमस’ असे म्हणत, शुभेच्छा दिल्या जात होत्या. ख्रिश्चन वसाहतीमध्ये गावातील व परिसरातील निमंत्रित मित्रमंडळीची फराळ व भोजनासाठी सायंकाळपर्यंत गर्दी होती. ३१ डिसेंबरपर्यंत साजऱ्या होणाऱ्या नाताळनिमित्त, येथे ख्रिस्ती मंडळीनी क्रीडा स्पर्धा, मनोरंजनाचे कार्यक्रम, भजन आदी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.