पोखलेत सुशिक्षित तरुणाचा शॉक लागून मृत्यू
कोडोली वार्ताहर:-
पोखले ता.पन्हाळा येथील साहिल (शाहरूख)शब्बीर मुजावर वय वर्षे २३ ह्या तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. शब्बीर मुजावर हा गावालगतच्या शिरी या नावाच्या शेतातील जनार्दन देशमुख यांच्या मालकीच्या विहिरीवर गेला होता. तिथे त्याला पाण्याच्या मोटरचा विजेचा शॉक बसून जागीच मृत्यू झाला.
पोखले ता.पन्हाळा येथे शब्बीर मुजावर यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू असून, बांधकामावर पाणी मारण्यासाठी जवळ असणाऱ्या जनार्दन देशमुख यांच्या विहिरीवर मोटार बसवून घरातीलच वीज पुरवठा करून गेला एक महिना पाणी उपसा करत होते. आज दुपारी नेहमी प्रमाणे पाणी उपसा सुरू असताना, अचानक पाणी बंद झाल्याने साहिल मुजावर हा विहिरीतील पाणी उपसा का बंद झाला, हे पाहण्याकरिता विहिरीवर गेला असता,पाण्याच्या मोटारीला हात लागताच शॉक लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. साहिल हा अविवाहित असून त्याचे शिक्षण बी.ई. इलेक्ट्रिकल झाले असून, कोल्हापूर येथील खाजगी कंपनीत तो कामाला होता. त्याच्या पश्चात आई वडील, एक भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे. साहिल याचा शॉक बसून झालेल्या मृत्यूमुळे पोखले गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात झाली असून, ए. एस.आय घोडके, पो.हवालदार संभाजी पाटील,पो.कॉ. काटकर हे तपास करत आहेत.