प्रलंबित पाणी योजनांना मंजुरी मिळाल्यास तालुका ऋणी राहील- आम.सत्यजित पाटील सरुडकर
मलकापूर प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन ऐतिहासिक किल्ले विशाळगडावरील पाणीटंचाई निवारणासाठी खास बाब म्हणून प्रस्तावित नळपाणी योजनेसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंगळवारी होणाऱ्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुर करण्याची घोषणा कृषी, पणन आणि स्वच्छता व पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली. शाहूवाडी तालुक्यातील प्रलंबित उर्वरित नळपाणी पुरवठा योजनांसाठीही एप्रिल नंतरच्या दुस-या टप्प्यात मंजुरी देण्याचे आश्वासन देतानाच, पाणीपुरवठा राज्यमंत्र्यांनी यावेळी संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाशी समन्वय राखण्याचे समिती पाणीपुरवठा अधिका-यांना स्पष्ट निर्देशही दिले.
सरकारच्या ‘ शासन आपल्या दारी ‘ उपक्रमांतर्गत शाहूवाडी पंचायत समिती सभागृहात आयोजित विविध खातेप्रमुखांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. आमदार सत्यजित पाटील-सरुडकर, जि. प. बांधकाम सभापती सर्जेराव पाटील-पेरीडकर, पं. स. सभापती डॉ. स्नेहा जाधव, प्रांताधिकारी अजय पवार, पाणीपुरवठा उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई, गटविकास अधिकारी डॉ. उदय पाटील, रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेशदादा पाटील, जि. प. सदस्य हंबीरराव पाटील, रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घाटगे यांच्यासह विविध खात्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी तहसीलदार चंद्रशेखर सानप यांनी स्वागत केले. तालुका कृषी अधिकारी बंडा कुंभार यांनी प्रास्ताविक केले.
राज्यमंत्री खोत पुढे म्हणाले, डोंगर कुशीत वसलेल्या आणि विपुल पर्जन्यमानाची नोंद होणा-या शाहूवाडी तालुक्यात पावसाळ्यानंतर पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते, ही बाबच मुळात वेदनादायी आहे. एखाद्या गावाची पाणीपुरवठा योजना पाच-पाच वर्षे प्रलंबित राहते, याला सरकारी अधिका-यांची अनास्था जबाबदार आहे. सरकार विविध योजनांमधून पैसा उपलब्ध करून देत असताना, अधिकारी कामच करण्याच्या मानसिकतेत दिसत नाहीत. आढावा बैठकीत झालेल्या विषयांचा इतिवृत्तामध्ये समावेश करण्याच्या सूचना करून, या पुढील आढावा बैठकीच्या प्रारंभी कामांचे मुल्यमापन स्वतः करणार आहे. यामध्ये कामात सुधारणा न झाल्यास संबंधितांना थेट कारवाईला सामोरे जावे लागेल. असा निष्क्रिय खातेप्रमुखांना उद्देशून मंत्री महोदयांनी यावेळी दमच भरला.
कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारी अधिका-यांना फैलावर घेत राज्यमंत्री खोत यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीतील वस्तुनिष्ठ माहिती समजण्यासाठी संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांची यादी बँकांच्या सूचना फलकावर आठवडाभरात लावण्याचे तोंडी आदेश दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना देताना जिथे वादाची पार्श्वभूमी नसेल, अशा ठिकाणच्या शेत पानंदीचे रस्ते पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्याचे आवाहन करतानाच, या पुण्यदाई कामासाठी विशेष आग्रही असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आपल्यासह अन्य खात्याशी निगडित ग्रामीण भागातील समस्या जाणून घेत, थेट जनतेशी संवाद साधण्याचा स्तुत्य पायंडा पाडल्याबद्दल राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे आमदार सत्यजित पाटील यांनी कौतुक केले. पुढे आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीतून मंत्रीमहोदयांचे लक्ष वेधत प्रलंबित पाणीपुरवठा योजनांना निधी मंजूर करून दिल्यास शाहूवाडीतील जनता तहहयात तुमच्या ऋणात राहिल, असे खोत यांच्याप्रती भावोत्कट उद्गारही आमदारांनी व्यक्त केले.