रोजीरोटी तूनच साहित्य निर्माण होते-जेष्ठ पुरोगामी साहित्यिक कॉ. नजूबाई गावित
शहादा,जि(नंदुरबार) ता.२३: मजुरी व रोजीरोटी करतात, तिथेच साहित्य निर्मिती असून, ते साहित्य कागदावर आणण्याचे काम नवोदित तरुण लेखकांनी करावे, असे प्रतिपादन साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा जेष्ठ पुरोगामी साहित्यिक कॉ. नजूबाई गावित यांनी केले.
शहादा येथे १३ व्या विद्रोही साहित्य-संस्कृती संमेलनात अध्यक्षीय भाषणात बोलत होत्या. यावेळी गावित म्हणाल्या, माझे शिक्षण चौथी झाल्याने माझ्या चिमूट भर साहित्यावर अनेकांनी टीका केल्या. पण मी साहित्य निर्मिती बंद केली नाही. आदिवासी समाजातील तरुणांनी लिखाणावर भर द्यावा. एका बाईवर एक कादंबरी होऊ शकते, एवढी अजूनही समाजात दुःख आहेत. आपण देशाचे मूळ मालक आहोत, हेच विसरलो आहे. सामान्य माणसापर्यंत घटना व अधिकार तळागाळातील लोकांच्या पर्यंत पोहचविण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी तरुणांनी प्रयत्न करावेत. आदिवासींना पाणी, जमीन, लाईट मिळत नाही, मग त्यांना घटनेने कोणते स्वातंत्र्य दिले.
साहित्य संमेलनाचे उदघाटन साम टीव्हीचे संपादक संजय आवटे यांनी केले. यावेळी आवटे म्हणाले, संस्कृतीचे सपाटीकरण सुरु आहे. महापुरुषांचे अपहरण करून देश समजत नाही. सध्या इतिहासाचे विकृतीकरण सुरु आहे. व्यवस्थेला भूल देण्याचे काम माध्यमे करत आहेत. आपणाला मुख्य प्रवाहाचे राजकारण हाती घ्यावे लागेल. सजग विचाराची माणसं घडवणे, हे आपल्या समोर आवाहन आहे. सर्व सामान्य माणसाच्या हातून व्यवस्था हिसकावून घेण्याचा प्रयत्न सुरु आहे.
गौतम कांबळे, राजकुमार तांगडे, स्वागताध्यक्ष वाहरु सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी गावातून ग्रंथ दिंडी काढण्यात आली.
स्वागत व प्रास्ताविक अनिल कुवर यांनी केले. यावेळी कॉ. बाबुराव गुरव, कॉ. धनाजी गुरव, माजी प्राचार्य विश्वासराव सायनाकर, प्रा.विजयकुमार जोखे, डोंगर बागुल, दिग्विजय पाटील, कॉ. कुमार शिराळकर, राजकुमार तांगडे, दत्तात्रय
पाटील, अमित शिवमारे,उपस्थित होते. आभार किरण मोहिते यांनी मानले.