सामन्यांच्या हृदयामधले अनभिषिक्त सम्राट-श्री. सुरेश नारकर
बांबवडे : राजकारणात एकदा निवडून येताना,अद्वितीय कष्ट करावे लागतात, परंतु इथ मात्र एक व्यक्ती सलग पाच वेळा निवडून येत आहे. निश्चितच हा विजय सोपा नव्हता, एका अग्निदिव्यातून जात असताना सलग २५ वर्षे जनतेच्या हृदयात आपले मानाचे स्थान कायमपणे टिकवून ठेवण्याचे शिवधनुष्य उचललं, आणि पेललं सुद्धा . ते नाव आहे श्री सुरेश शंकर नारकर.
हे व्यक्तिमत्वं रस्त्यावरचं व्यक्तिमत्वं म्हटलं तर, चुकीचं ठरू नये. कारण हि व्यक्ती कोणाचंही काम असो ,नेहमीच तयार असते. त्यामुळे घरी कमी आणि रस्त्यावर अधिक. सुरेश ( बापू ) हे व्यक्तिमत्वं अडलेल्या, नडलेल्या लोकांचा एकमेव आधार. कोणाला कशाचीही अडचण असली, ती व्यक्ती बापुंपर्यंत गेली, कि त्यावर काही ना काही मार्ग निघालेला असतो. “समाज माझा,आणि मी समाजाचा” या धर्तीवर आपलं काम करणारी ही व्यक्ती नेहमीचं निरपेक्ष भावनेनं समाजासमोर गेलेली आहे. एकेकाळी स्व. अशोकभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केलेल्या या समाजसुधारकाने नेहमीच जनतेचे हित जोपासले. बांबवडे पंचक्रोशीत सुरेश बापू हे नाव सर्वांनाच परिचित आहे. हे सगळं जरी खरं असलं ,तरी सलग पाच पंचवार्षिक निवडून येणं, म्हणजे खऱ्या अर्थाने लोकशाहीला जनतेने दिलेला बहुमान म्हणावयास हरकत नाही. विशेष म्हणजे केवळ एकाच प्रभागातून नव्हे, तर वेगवेगळ्या प्रभागातून निवडून आलेली ही व्यक्ती, सामान्य जनतेला दीपस्तंभाप्रमाणे वाटते, राजकारणाचा आणि समाजकारणाचा एवढा गाढ अभ्यास क्वचितच कुणी केला असेल.
केवळ राजकारण म्हणून नव्हे, तर समाजकारणात देखील या व्यक्तीचा कोणी हात धरत नाही. वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या गावासाठी निधी आणणे हा त्यांचा ध्यास आहे. यासाठी ते राजकीय भेदाभेद मानत नाहीत. गावच्या भल्यासाठी तडजोडीला देखील मागे पडत नाहीत. गावच्या भल्यासाठी चार पावलं मागे यायला देखील, त्यांची कधीच आडकाठी नसते. सामाजिक आंदोलनात ते निमंत्रणाची कधी वाट पहात नाहीत.
समाजाला नेमकं काय हवं असतं, याच्या शोधात बापू नेहमी असतात. गरीबाच्या संसाराला आर्थिक हातभार लावायला देखील, ते कधी कमी पडत नाहीत. त्यामुळे तळागाळातील असलेला वर्ग तुम्हाला जरी प्रचारात दिसत नसला, तरी तो मतदानाच्या स्वरुपात आपलं अस्तित्व नेहमीच दाखवत आला आहे. आणि हीच बापूंच्या कामांची पोहोच पावती असते. म्हणूनच बापू सलग २५ वर्षे समाजाचे नेतृत्व करीत आहेत.
एकूण काय केवळ राजकारणासाठी,राजकारण नव्हे, तर समाजकारणासाठी राजकारण करणारी हि व्यक्ती, निश्चितच प्रशंसनीय आहे. त्यांच्या या विजयात खऱ्या अर्थाने ‘स्व. अशोकभाऊ ‘ यांची प्रतिमा साकार होत आहे. कारण ज्यांच्या बोटाला धरून ते राजकारणात आले, ते त्यांचे श्रेय त्यांना विनम्रपणे निश्चितच आजवर देत आले आहेत. भविष्यात सामान्य जनतेच्या हृदयावर अनभिषिक्त राज्य करणारे हे व्यक्तिमत्वं समाजाच्या विकासासाठी हिमालायासम कामाची उंची गाठतील यात शंका नाही.