तडवळे येथे ३३/११ के.व्ही.वीज उपकेंद्राचे उद्घाटन
शिराळा प्रतिनिधी : तडवळे वीज उपकेंद्रामुळे इतर ठिकाणच्या वीज केंद्रावरील भार कमी झाल्याने आता वीज पुरवठा करण्यास सुलभता येणार आहे. शेतीच्या विजेच्या दृष्टीने ही बाब फायदेशीर आहे. वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, अशी काळजी घेत, अडचणीवर मार्ग काढावेत. व्यवहारी भूमिका ठेवून ग्राहक हित जोपासावे, असे प्रतिपादन आमदार शिवाजीराव नाईक यांनी केले.
तडवळे (ता.शिराळा) येथे नव्याने उभारलेल्या ३३/११ के.व्ही.वीज उपकेंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अधीक्षक अभियंता संजय साळी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी नाईक म्हणाले, शेतीच्या विजेच्या दृष्टीने ही बाब फायदेशीर असून, यामुळे शेतीसह छोटे मोठे उद्योग करणाऱ्यांसाठी आता पुरेशा दाबाने वीज पुरवठा होणार आहे. तडवळेसह, गवळेवाडी या ठिकाणी उपकेंद्र व्हावे, म्हणून आम्ही शासन दरबारी सातत्याने प्रयत्नशील होतो, त्यास यश मिळाले आहे. आता तडवळे सह उपवळे, कदमवाडी, बिऊर, शांतीनगर, पावलेवाडी, अस्वलेवाडी, रिळे, बेलेवाडी, मोरेवाडी, पाडळी, पाडळेवाडी, अंत्री बु., औंढी, दुरंदेवाडी,निगडी या गावातील लोंकाचा पुरेशा दाबाचा विजेचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला आहे. त्यामुळे शिराळा व शिराशी उपकेंद्रावरील भार कमी झाला आहे.वीज वितरण कंपनीला सोई सुविधा मिळाव्यात, यासाठी देखील प्रयत्न करणार आहे.
अधीक्षक अभियंता संजय साळी,जिल्हा परिषद सदस्य सत्यजित देशमुख, भाजपा तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
स्वागत व प्रास्ताविक सहाय्यक अभियंता भंडारी यांनी केले. कार्यक्रमास सरपंच मेघा पाटील, अशोकराव पाटील, ज्ञानदेव पाटील, उत्तम पाटील, मोहन पाटील, भरत निकम, सुजित देशमुख, कार्यकारी अभियंता प्रशांत दानोळे, प्रशांत कुमार, के.जी. देसाई उपस्थित होते. आभार उप कार्यकारी अभियंता पी. एम. बुचडे यांनी मानले.