टेकोली येथील जवानाचा आकस्मिक मृत्यू : तालुक्यावर शोककळा
मलकापूर प्रतिनिधी : टेकोली तालुका शाहुवाडी येथील १४८ लाईट एडीचे जवान रमजान मंहमद हवालदार वय ३७ वर्षे यांचे आसाम येथील न्यूजल पायघुडी येथे कर्तव्य बजावताना आकस्मिक निधन झाल्याने कुटुंबियांसह संपूर्ण तालुका शोकसागरात बुडाला आहे.
शाहुवाडी पासून तीन कि.मी. अंतरावर असलेल्या टेकोली गावातील जवान रमजान हावलदार हे देश सेवेसाठी लष्करात २० वर्षांपूर्वी नाशिक येथे शिपाई पदावर भरतीझाले होते. वर्षभरानंतर ते सेवा निवृत्त होणार असल्याची माहिती मिळाली असून, सध्या आसाम येथील न्यूजल पायघुडी या ठिकाणी आपली सेवा बजावत होते. २६ डिसेंबर रोजी त्यांच्या आकस्मिक दुःखद निधनाची बातमी कुटुंबियांना समजली. जवान रमजान हावलदार यांच्या निधनाची बातमी समजताच कुटुंबियांना धक्काच बसला.त्याचबरोबर संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव शुक्रवार दि.२९ डिसेंबर रोजी टेकोली येथे आणले जाणार आहे.
त्यांचे पार्थिव दिल्ली येथून विमानाने पुणे येथे व त्यानंतर कोल्हापूर येथे आणले जाणार असून कोल्हापूर येथे मानवंदना दिल्यानंतर सकाळी सहा वाजता त्यांच्या टेकोली या गावी नेले जाणार आहे. शाहुवाडी येथे पार्थिव आल्यानंतर तेथून ते सजवलेल्या ट्रॅक्टर मधून गावी घेवून जाणार आहेत.
देशाची सेवा करताना आपल्या गावच्या जवानाचं निधन झाल्याने संपूर्ण टेकोली गाव शोकसागरात बुडाले असून गावाने दुखवटा पाळला आहे.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, दोन मुलगे, सहा भाऊ, पुतणे, असा परिवार आहे.