परिवर्तनासाठी जनसंघटना उभ्या कराव्यात- कॉ. नजूबाई गावित
शहादा,जि(नंदुरबार) ता.२४ : सांस्कृतिक चळवळीने परिवर्तन घडणार नसल्याने त्यासाठी जन संघटना उभ्या कराव्या लागतील . फॅसिझमचा बिमोड करण्यासाठी सज्ज व्हा, असे प्रतिपादन साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा जेष्ठ पुरोगामी साहित्यिक कॉ. नजूबाई गावित यांनी केले.
शहादा येथे १३ व्या विद्रोही साहित्य-संस्कृती संमेलनाच्या सांगता समारोप प्रसंगी बोलत होत्या . यावेळी गावित म्हणाल्या, जागतिकीकरण, खाजगीकरण यामुळे बुद्धिजीवी घडण्याची प्रक्रिया धोक्यात आहे. आदिवासींना संविधानाने दिलेले हक्क पायदळी तुडवले जात आहे. त्यांच्या विकासाची साधन संपत्ती पळवली जात आहे. त्यामुळे दारिद्र्य व कुपोषण वाढत आहे. देशाला येथील सत्ताधाऱ्यापासून हुकूमशाहीचा मोठा धोका असून, झुंडशाही शक्तीने जोर धरला आहे. हि संमेलने महाराष्ट्रा बाहेर झाली पाहिजेत.
यावेळी डॉ.भारत पाटणकर म्हणाले, जात, वर्ग स्त्री दशा अंता शिवाय लोकशाही मूल्य व्यवस्था बळकट होणार नाही. जाती व्यवस्था हि मनोधारणा आहे. ती नष्ट झाली पाहिजे. आता फॅसिझम येऊ पाहत असल्याने, लोकशाहीच्या रक्षणासाठी लाखो लोकांना उभे करणे, हि गरज आहे. चळवळीत तरुणांनी झोकून देण्याची गरज आहे. बेभान होऊन तरूणांनी काम केले, तर आपले ध्येय साध्य होईल. यावेळी शिराळा-वाळव्यातील कलाकारांनी आसूड हे नाटक सादर करून उपस्थितांना मंत्र मुग्ध केले.
यावेळी बहुजन समाजाने लढून मिळवलेला शिक्षणाचा हक्क काढून घेण्याचा कुटील डाव, सरकारी शाळा, वसतीगृह स्कॉलरशिप बंद करणे, अभ्यासक्रमाचे विकृतीकरण करणे, याबाबत श्रीरंजन व मयूर खाडे , भारतीय राज्य घटनेतील मूलभूत हक्क आणि नियोजन पूर्वक हिंसा, विचारवंतांचे खून, शेतकऱ्यांची आत्महत्या, भूक बळी, यावर महेश निनाळे, लिंगायत धर्म मान्यतेचे आंदोलन आणि जैन, बुद्ध, शीख धर्मा पुढील प्रश्न कॉ. अविनाश भोसरे, आजकालची प्रसार माध्यमे आणि लोकशाही प्रा. गौतम काटकर, धनाजी कांबळे, सरस्वती पूजक आणि परशुराम-नथुराम समर्थक अखिल भारतीय साहित्य संमेलन आणि विद्रोहीची भूमिका :अविनाश कदम. मराठी साहित्य,चित्रपट आणि आदिवासी संस्कृती या विषयावर बापू चंदनशिवे, प्रा.प्रशांत नगावकर यांनी गट चर्चा केली.
अरे, दादा फॅसिझम विरोधात मी तुझ्या सोबत आहे. पितृ सातक्ततेच्या विरोधात तू मला साथ देशील का? या विषयी प्रा.सचिन गरुड, ठगीबाई वसावे, रंजना पवार, श्रुती आवटे या विषयी आपले विचार मांडले.
डॉ.गणेश देवी आणि डॉ.सुरेखा देवी यांची अशोक राजवाडे व विजय मांडके यांनी मुलाखत घेतली.
यावेळी मुडनाकुडु चिन्नास्वामी , सुधीर अनवले, कॉ. धनाजी गुरव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी कॉ. प्रा.गेल ऑमव्हेट, कॉ. बाबुराव गुरव, कॉ. धनाजी गुरव, माजी प्राचार्य विश्वासराव सायनाकर, प्रा.विजयकुमार जोखे, डोंगर बागुल, दिग्विजय पाटील, कॉ. कुमार शिराळकर, बी.जी.पाटील, सुधीर अनवले, सदाशिव मगदूम, डॉ.छाया दातार, विजय वळवी उपस्थित होते. आभार रवींद्र मुसकडे यांनी मानले.