या मातीला कर्तुत्वाचा सुगंध आहे- श्री रणवीरसिंग गायकवाड
बांबवडे : सत्यजित आबांच्या रूपाने पुन्हा एकदा तालुक्यात खासदारकी खेचून आणायची आहे. आणि पुन्हा एकदा स्व. गायकवाड साहेबांची प्रतिमा खासदार आबांच्या माध्यमातून आपल्याला पहायची आहे. यासाठी जीवाचे रान करावे लागणार आहे. परंतु सह्याद्रीच्या या मातीला कर्तुत्वाचा सुगंध आहे. असे आपला इतिहास सांगतो, हे विसरू नका. आणि जोमाने कामाला लागा, असे भावनोत्कट उद्गार केडीसिसी बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड यांनी काढले.
ते आपल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत तडफेने बोलत होते. यावेळी अनेक कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते.उद्धव ठाकरे शिवसेनेचे निष्ठावान शिवसैनिक माजी आमदार सत्यजित पाटील आबांची उमेदवारी जाहीर झाली आणि मतदारसंघात रणरागिणी संचारली असल्याचे दृश्य आहे. यावेळी हातकणंगले लोकसभा मतदार संघात कस प्रचार करायचा याचे नियोजन करण्यात आले.
यावेळी रणवीरसिंग गायकवाड पुढे म्हणाले कि, गेल्यावेळी किरकोळ गफलतीने आबांचा पराभव झाला, तो आमच्या जिव्हारी लागला आहे. त्याची भरपाई करण्याची हि नामी संधी चालून आली आहे. ज्यांच्या खासदारकीसाठी आबांसह आम्हीदेखील हातकणंगले लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला. पण त्यांनी निष्ठेशी गद्दारी केली आणि शिवसेना सोडली. त्यांना जनतेने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी मतदान केले होते. पण त्यांनी इथल्या जनतेचा विचार न करता खोक्यांचा विचार केला. अशा मंडळींना इथली जनता कधीच माफ करणार नाही. असेदेखील रणवीरसिंग गायकवाड यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सांगितले.