शाहुवाडी पं.स.च्या सभापती,उपसभापतींनी घेतली झाडाझडती
मलकापूर ( प्रतिनिधी ): शाहुवाडी पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतींनी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अशी काही हजेरी घेतली कि,यातून “साहेब भागात गेलेत ?” भविष्यात या प्रश्नाला उत्तर उपलब्ध झाल्याशिवाय रहाणार नाही.
शाहुवाडी पंचायत समिती मध्ये नूतन पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला, आणि त्यानंतर त्यांनी कारवाईचे पहिले पाऊल टाकले. ते होते पंचायत समितीमध्ये कामास असलेले अधिकारी आणि पदाधिकारी वेळेत कामावर येतात कि,नाही ? याची पडताळणी केली. कारण पंचायत समितीमध्ये कामासाठी येणारे नागरिक ,साहेब भागात गेलेत,या उत्तराने परिचित झाले आहेत. असले अधिकारी नक्की कोणत्या भागात गेलेत, याची चौकशी करण्यासाठी सभापती डॉ.स्नेहा जाधव, व उपसभापती दिलीप पाटील यांनी हजेरी घेतली. अचानक पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या या पवित्र्यामुळे अनेक ‘लेटकमर’ सापडले, कोण नक्की कोणत्या भागात गेलेत,हे समजले. विना रजेचे गैरहजर राहिलेले महाशय देखील सापडले.
यातून संपूर्ण तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांना कसा त्रास होतो, याची कल्पना देखील अधिकाऱ्यांना या पदाधिकाऱ्यांनी करून दिली. एकूणच तालुक्यातील जनतेला होणाऱ्या त्रासाची जाणीव ठेवणारे कुणीतरी आहे, हे पाहून जनतेतून मात्र समाधान व्यक्त केले जात आहे.