कोडोली पोलिसांच्या वतीने ध्वनिप्रदूषणाच्या संदर्भाने प्रबोधन
कोडोली प्रतिनिधी:-
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणुकीत अथवा उत्सव काळात ध्वनिप्रदूषण होऊ नये, यासाठी कोडोली पोलिसांच्या वतीने ध्वनिप्रदूषणाच्या गंभीर बाबी संदर्भाने कार्यक्षेत्रात प्रबोधनाला प्रारंभ झाला.
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील, कोल्हापूरचे पोलीस अधिक्षक संजय मोहिते, शाहूवाडी विभागाचे पोलिस उपअधीक्षक आर.आर.पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव, फौजदार संदीप बोरकर, श्याम देवणे यांसह पोलिस कर्मचारी, यानी कार्यक्षेत्रातील सर्वच मंडळांना सी.आ.पी.सी. १४९ प्रमाणे मंडळाना नोटिसा देऊन सर्वच मंडळांना उत्सवाबाबत पोलिस ठाण्याचा परवाना घ्यावा, ध्वनिप्रदूषण कायद्याचा भंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी, मंडळाच्या ठिकाणी आपले कार्यकर्ते सभासद उपस्थित कायमपणे ठेवावेत, अशी विनंती करून या संदर्भाने विशेष बैठका घेऊन मार्गदर्शनही केले होते.
शेवटच्या टप्प्यात सर्वच गणेश मंडळांना डॉल्बीचे दुष्परिणाम तसेच या माध्यमातून होणारे ध्वनिप्रदूषण याचे गांभीर्य ध्वनीप्रदूषण कायदा याअंतर्गत होणारी शिक्षा व त्याचे होणारे परिणाम या संदर्भाने सविस्तर प्रबोधन स्पीकरच्या माध्यमातून कार्यक्षेत्रातील गावात पोलीस ठाणेच्या वतीने करण्यास गुरुवारी सकाळी प्रारंभ झाला.
याप्रसंगी स.पो.नि. विकास जाधव,पोलीस उपनिरीक्षक संदीप बोरकर, सहायक फौजदार विठ्ठल बहिरम, हवालदार घोरपडे, पोलीस कर्मचारी उपस्थित होते.