अखिल भारतीय किसान संघर्ष समिती च्या वतीने आज बांबवडे त ” रास्ता रोको ” संपन्न
बांबवडे : अखिल भारतीय किसान संघर्ष समिती च्या वतीने आज बांबवडे तालुका शाहुवाडी इथं ” रास्ता रोको ” करण्यात आला. केंद्र शासनाने शेतकरी विरोधी विधेयक मंजूर केले असून, त्याच्या निषेधार्थ हा रास्ता रोको करण्यात आला,तर २६ नोव्हेंबर रोजी देशव्यापी भारत बंद आंदोलन करण्यात येणार आहे. अशा आशयाचे निवेदन समिती च्यावतीने शाहुवाडी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख यांना देण्यात आले.

निवेदनात नमूद केलेल्या आशयानुसार, केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी मंजूर केलेल्या विधेयकाने व्यापाऱ्यांना बाजार समिती च्या वतीने अन्नधान्य विकत घेतले पाहिजे, यातून सूट मिळाल्यामुळे भविष्यात बाजार समित्या बंद पडण्याचा धोका संभवत आहे. दरम्यान सर्व सामान्य जनतेला रेशन वर मिळणारे आन्धान्य हे बाजार समिती अंतर्गत मिळते.ते व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या अन्नधान्य खरेदीवर मिळालेल्या नफ्यातून दिले जाते. जर बाजार समित्या बंद पडल्या तर सर्व सामान्य शेतकऱ्यांना रेशन वर अन्नधान्य कसे मिळणार?, दरम्यान शेतकऱ्याकडून घेतलेल्या मालाला हमीभाव मिळणार नाही, ह्या सर्व गोष्टी शेतकऱ्यांच्या विरोधात असणार आहेत.


आज शेतकरी आपला माल कुठेही विकू शकतो, या नावाखाली बाजार समित्या बंद पाडण्याचा डाव केंद्र शासनाने आखला असून, यातून शेतकऱ्याला हमीभाव मिळणारच नाही. यासाठी देशातील ३०० शेतकरी संघटना एकत्र येवून, अखिल भारतीय किसान संघर्ष समिती आकाराला आली आहे. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष आदी संघटना एकत्र आल्या आहेत. याचेच प्रातिनिधिक स्वरूप म्हणून शेतकरी विरोधी विधेयकाच्या निषेधार्थ बांबवडे इथं रास्ता रोको करण्यात आला.
यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे भाई भारत पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुरेश म्हाऊटकर, जयसिंग पाटील, अवधूत जानकर, अमर पाटील, पद्मसिंह पाटील, संतोष पाटील, गुरुनाथ शिंदे, रामभाऊ लाड, अनिल पाटील, राजू रेठरेकर ( पाटील ), संजय केळसकर, पांडुरंग पोवार, गणेश निकम,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.