कांदे ग्रामपंचायतीस टाळे
शिराळा/ प्रतिनिधी: कांदे (ता.शिराळा ) येथील ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक नसल्याने गावातील नागरिकांना लागणारे विविध दाखले व अनेक प्रस्ताव एप्रिल महिन्यापासून मिळाले नसल्याने ग्रामपंचायत सदस्य दीपक पाटील यांनी संतप्त ग्रामस्थांसह टाळे ठोकले.
याबाबतचे निवेदन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ.के.जी.माली यांना दिले आहे.
या निवेदनात कांदे ग्रामपंचायत सदस्य दीपक पाटील यांनी म्हंटले आहे कि, कांदे गावची लोकसंख्या सुमारे सात हजार आहे. ग्रामपंचायतीस १४ एप्रिल पासून रीतसर ग्रामसेवक नाही. मुलांच्या शाळा चालू झाल्यापासून अनेक दाखले देण्याचे काम प्रलंबित आहेत. मतदान नोंदणी, विविध योजनेचे प्रस्ताव, ग्रामपंचायतीचे आर्थिक व्यवहार व विकास कामे खोळंबली आहेत. अनेंक वेळा संबधित विभागाकडे लेखी तोंडी विनंती करून देखील ग्रामसेवक हजर झालेला नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांच्या मदतीने ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकले. या निवेदनावर मिलिंद कांबळे, विश्वजित पाटील, शुभम पाटील, सागर पाटील, विशाल पाटील, सुरज पाटील, अभिजित पाटील, प्रमोद पाटील यांचेसह ग्रामस्थ यांच्या सह्या आहेत.