आटपाडी तालुक्यात तीन लहानग्यांचा बुडून मृत्यू
सांगली प्रतिनिधी :सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील जांभूळी गावातील तीन लहान मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तीनही मुलांचे मृत शरीर बाहेर काढण्यात आले असून, सदर च्या घटनेबाबत परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

जांभूळी गावातील हि मुले पाण्यात मासे पकडण्यासाठी गेली होती. त्यांचे कुत्रे ओढ्यात पडल्याने त्याला वाचविण्यासाठी हि मुले ओढ्यात उतरली, आणि त्यामुळे वाहून जावून ती बुडाली. रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरु होती. ह्या मुलांची मृत शरीरे आज सकाळी बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले.

यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार सचिन मुळीक, पोलीस उपनिरीक्षक भानुदास निंबोरे घटनास्थळी उपस्थित होते.

सदर घटनेची माहिती आपत्ती व्यवस्थापक श्री नदाफ यांना मिळताच तत्काळ शोध मोहीम सुरु करण्यात आली. यावेळी आयुष सेवाभावी संस्था, सांगली, विश्वसेवा फौंडेशन भिलवडी, यांनी शोध कार्यात सहकार्य केले. आयुष टीम चे प्रमुख अविनाश पवार, इम्तियाज बोरगावकर, अमोल व्हटकर, यश मोहिते, अजित रायमाने, संतोष कोकाटे, मुस्ताक बोरगावकर, इर्शाद बोरगावकर आदी मंडळींनी या कामी सहकार्य केले.