एकनिष्ठतेच्या वृक्षाला प्रतिष्ठेचे फळ : श्री नामदेव गिरी
बांबवडे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कोल्हापूर जिल्हाप्रमुख (हातकणंगले विभाग ) पदी श्री नामदेवराव शामराव गिरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबद्दल त्यांचे साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स, एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने हार्दिक अभिनंदन .
एकेकाळी फक्त ‘ जय महाराष्ट्र ’ म्हणत स्व. मधुकर पाटील , नामदेव गिरी ह्या मुलांनी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर पितृतुल्य प्रेम केले. कोणतीही अपेक्षा न बाळगता, शिवसेनेच्या प्रचारासाठी डोंगर वस्त्या पालथ्या घातल्या. कधीही शिवसेनेची कास सोडली नाही. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही, कोणत्याही आमिषाला कधी बळी न पडणारे व्यक्तिमत्व म्हणजे श्री नामदेव गिरी असे म्हटल्यास वावगे ठरू नये. एक्निष्ठतेच्या वृक्षाला प्रतिष्ठेचे फळ लागले आहे. कधी काळी उदरनिर्वाह साठी भाजी विकायलाही लाज न बाळगणारे हे तरुण बंधू आज निश्चित एका मोठ्या पदापर्यंत झेप घेत आले आहेत. नामदेवराव यांचे मोठे बंधू श्री सुखदेव गिरी हे देखील पत्रकारितेच्या मोठ्या पदावर आज कार्यरत आहेत. वडिलांच्या नंतर घराच्या प्रपंचाचा भार या दोन्ही बंधूंनी स्वीकारून आपले कर्तव्य पार पाडत राहिले. यातूनही शिवसेनेवर , छत्रपती शिवाजी महाराजांवर मनापासून प्रेम करणारे हे दोन्ही बंधू समाजासमोर सध्या येत आहेत. परंतु प्रसिद्धी च्या कधी मागे लागले नाहीत.
आपल्याकडे राजकारणात जावू नका. असे सल्ले देणारे खूप मिळतात. परंतु राजकारणात राहून सुद्धा आपली प्रगती करता येते. हे श्री नामदेवराव यांच्याकडे पाहून कळते. त्यांचा शिवसैनिक ते जिल्हाप्रमुख पद हा प्रवास संघर्षशील आहे. परंतु तो तीमिराकडून तेजाकडे जाणारा प्रवास आहे. हेच त्यांच्या आजच्या नियुक्ती वरून दिसून आले.
हिंदू हृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे, तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद, यामुळेच श्री नामदेवराव यांना जिल्हाप्रमुख पदाची संधी मिळाली. तसेच शिवसेना नेते विनायक राऊत, सुनील प्रभू, संपर्कप्रमुख अरुण दुधवाडकर (भाई ), शाहुवाडी पन्हाळा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार श्री सत्यजित पाटील सरूडकर यांच्या सूचनेने या पदापर्यंत मजल मारता आली.
या जिल्हाप्रमुख पदामुळे शाहुवाडी तालुक्याला पुन्हा एकदा मानाचे स्थान मिळाले असून, शाहुवाडी च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पुनश्च श्री नामदेव गिरी आणि त्यांचे बंधू सुखदेव गिरी आणि त्यांच्या परिवाराचे मनापासून अभिनंदन. दरम्यान भेडसगाव चे माजी सरपंच श्री अमरसिंह पाटील यांनी सुद्धा श्री नामदेवराव गिरी यांचे श्रीफळ देवून मानाचा फेटा बांधून अभिनंदन केले.
यावेळी पत्रकार दशरथ खुटाळे, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख योगेश कुलकर्णी, बांबवडे शहर प्रमुख सचिन मूडशिंगकर, उप जिल्हा संघटिका अलका भालेकर, तालुका संघटिका पूनम भोसले, शुभांगी कोलते, प्रभा मोरे, अमर पाटील युवसेना उपजिल्हा प्रमुख आदी मान्यवर नामदेव गिरी यांचे अभिनंदन करण्यासाठी उपस्थित होते.

