कोरोना संक्रमणात घोळसवडे येथील काही नागरिक रेशन पासून वंचित
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील चांदोली- घोळसवडे येथील १० ते १५ रेशन धान्य धारकांना रेशन कार्ड ऑनलाईन नसल्याने ऐन कोरोना काळात शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. याकडे महसूल विभागाने लक्ष देवून त्वरित चौकशी करावी , अशी मागणी या ऑनलाईन नसलेल्या रेशनकार्ड धारकांनी केली आहे.
याबाबत सविस्तर हकीकत अशी कि, चांदोली- घोळसवडे या गावातील रेशन वाटप काही महिन्यांपासून स्वतंत्र करण्यात आले आहे. यामुळे काही रेशन कार्ड धारक ऑनलाईन होण्यापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे रेशन दुकानदार सदर च्या ग्राहकांना धान्य वितरण करीत नाहीत. यामुळे कोरोना काळात सामान्य जनतेला शासनाच्या विविध योजना मिळाल्या नाहीत. गेल्या तीन महिन्यापासून चाललेला हा खेळखंडोबा महसूल विभागाला दिसत नाही का? असा प्रश्न येथील सामान्य जनता करीत आहे. सदर बाबत चांदोली येथील दिलीप बबन शिंदे यांनी लेखी तक्रार देखील केली आहे.
येथील दोन रेशन वाटप करणाऱ्या दुकानदारांच्या बेफिकिरीमुळे ह्या सामान्य नागरिकांना, शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागले आहे. याची त्वरित चौकशी व्हावी, अशी मागणी जनतेतून होवू लागली आहे.