खाजगी डॉक्टरांनी सहकार्य करावे- खासदार माने यांचे आवाहन
शाहुवाडी प्रतिनिधी : शाहुवाडी तालुक्यात सध्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना, खाजगी डॉक्टरांनी प्रशासनाला सहकार्य करावे, जेणेकरून तालुक्यातील प्रत्येक घटकापर्यंत वैद्यकीय सेवा पोहचली जाईल, आपण हे सहकार्य करा, मी आपल्यासोबत, आपली काळजी घेण्याचे आश्वासन देतो. सध्या तालुक्यातील समाजाला आधाराची गरज आहे, तो आधार आपण बनल्यास आपण तालुक्याला समन्वयाने या महामारीतून बाहेर काढू, असे मत खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केले.
खासदार धैर्यशील माने यांनी शाहुवाडी व पन्हाळा तालुक्यातील खाजगी डॉक्टरांची बैठक शाहुवाडी येथील संकल्प सिद्धी मंगल कार्यालयात आयोजित केली होती. या बैठकीस जिल्हाधिकारी दौलत देसाई याचं विशेष सहकार्य लाभलं.
यावेळी खासदार माने पुढे म्हणाले कि, शाहुवाडी तालुक्यातील शासकीय आरोग्य यंत्रणेने उल्लेखनीय कार्य सुरु ठेवले आहे. याचा मला नितांत आदर आणि अभिमान आहे. याच पद्धतीने खाजगी डॉक्टरांनी आपली सेवा द्यावी ,त्यांची काळजी देखील शासकीय डॉक्टरांप्रमाणे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी मी स्वत: बोलेन, शासकीय डॉक्टरांप्रमाणे विमा सुविधा मिळवून देण्यासंदर्भात देखील मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करेन, याची खात्री बाळगावी. असेही खासदार धैर्यशील माने यांनी सांगितले.
सुरुवातीला स्वागत व प्रास्ताविक जिल्हापरिषदेचे आरोग्य सभापत्ती हंबीरराव पाटील यांनी केले.
यावेळी माजी आमदार सत्यजित पाटील यावेळी म्हणाले कि, खाजगी डॉक्टरांनी या आवाहनाला उत्स्फुर्द प्रतिसाद द्यावा. त्यांच्यासाठी खाजगी मोबाईल व्हॅन ची सुविधा उपलब्ध करून दिल्यास, सामान्य जनतेला याचा अधिक लाभ होईल.
यावेळी प्रांताधिकारी बी.आर.माळी म्हणाले कि, कोणीही आपली ओपीडी बंद ठेवू नका. आपला आधार सर्वसामान्य जनतेचे मनोधैर्य उंचावणारा आहे. ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे, त्या त्या ठिकाणी आपण सेवा द्यावी. काही संशयित पेशंट आढळल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही श्री माळी यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद आरोग्य सभापती हंबीरराव पाटील, गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, तालुका वैद्यकीय अधिकारी एच.आर.निरंकारी यांनी एकूण परिस्थितीचा आढावा घेतला.
दरम्यान खाजगी डॉक्टर प्रसाद कुलकर्णी, डॉ.अभिजित यादव, डॉ. झुंजार माने, डॉ. ठाणेकर, डॉ. संजय गांधी आदी डॉक्टर मंडळींनी आपल्या काही अडचणी व समस्या याठिकाणी मांडल्या, त्याबाबतही सकारात्मक चर्चा करण्यात आली.
या बैठकीस पन्हाळा तालुका वैद्यकीय अधिकारी अनिल कवठेकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी, तालुका प्रमुख दत्ता पोवार, अमर् पाटील आदी मान्यवरांसह शाहुवाडी आणि पन्हाळा तालुक्यातील सुमरे ६५ खाजगी डॉक्टर यावेळी उपस्थित होते. आभार अमर पाटील यांनी मानले.