गुन्हेगारीला वचक बसविण्यासाठी सीसी टीव्ही कॅमरांचे लोकार्पण – सरपंच सागर कांबळे
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे हि मुख्य बाजारपेठ असून, इथं सर्वाधिक वर्दळ असते. त्यामुळे गुन्हेगारी सुद्धा वावरत असते. अशावेळी या गुन्हेगारीला वचक बसविण्यासाठी, तसेच गुन्हेगारीचा शोध लावण्यासाठी गरजेचे असलेले सीसी टीव्ही कॅमरांचे लोकार्पण आपण शाहुवाडी पोलीस ठाणे ला करीत आहोत. असे मत बांबवडे चे लोकनियुक्त सरपंच सागर कांबळे यांनी व्यक्त केले.

बांबवडे येथील व्यापारी वेल्फेअर असोसिएशन व ग्रामपंचायत बांबवडे यांच्या संयुक्त विद्यमाने ८ सीसी टीव्ही कॅमरांचे लोकार्पण यावेळी इथं करण्यात आले. यापैकी सोनारपेठ इथं २ , पिशवी रोड इथं २ , सरूड फाटा चौक इथं २ , पोलीस ठाण्यासमोरील चौकात २ ,असे ८ सीसी टीव्ही कॅमरा बसविण्यात आले आहेत.

यावेळी सरपंच सागर कांबळे पुढे म्हणाले कि, ग्रामपंचायत पोलीस ठाण्याला आम्ही सर्वतोपरी सहकार्य करीत आहे. परंतु बांबवडे येथील एसटी स्टँड च्या चौकात, तसेच सरूड फाटा इथं वेळोवेळी वाहतुकीचा खोळंबा होत असतो. तो टाळण्यासाठी पोलीस ठाण्याने कार्यवाही करावी. तसेच हे सीसी टीव्ही कॅमरा अखंडितपणे सुरु राहतील,याची काळजी घ्यावी.

यावेळी व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष बाळासाहेब खुटाळे म्हणाले कि, बांबवडे व्यापारपेठ मोठी आहे. त्यामुळे इथं नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. त्याकडे पोलीस प्रशासनाने जागरूकपणे लक्ष द्यावे.

यावेळी माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विष्णू यादव म्हणाले कि, बांबवडे इथं पोलीस चौकी साठी मिळालेले कर्मचारी कामाचे असावेत. कारण बऱ्याच वेळी इथं वाईट अनुभव आला आहे. वाहतुकीची कोंडी, तसेच अनेक प्रश्न आहेत, याकडे पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक लक्ष द्यावे.

तसेच बांबवडे पंचक्रोशी ची व्याप्ती पाहता इथं बांबवडे चौकी ऐवजी बांबवडे पोलीस ठाणे बनावे,अशी आमची मागणी आहे.

यावेळी शाहुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय पाटील म्हणाले कि, आपला तालुका दुर्गम आहे. बांबवडे हि प्रमुख बाजारपेठ आहे. येथून अनेक मार्ग विविध दिशेला जात आहेत. या सीसी टीव्ही मुळे अनेक गुन्हे उघडकीस येण्यास निश्चित मदत होणार आहे. तसेच वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पार्किंग सुव्यवस्थितपणे होणे गरजेचे असते. यसाठी रस्त्याच्या दुतर्फा पांढरे पट्टे मारल्यास , पट्ट्याच्या आत असलेल्या दुचाकी व्यवस्थितपणे पार्क होतील. तसेच पट्ट्याच्या बाहेर असणाऱ्या वाहनांवर आम्हाला कारवाई करता येईल. तसेच तालुक्याला निर्भया पथकासाठी स्वतंत्र वाहन मिळाले आहे. त्यामुळे गुन्हेगारीवर निश्चितच वचक बसेल. यासाठी ११२ या क्रमांकावर संपर्क केल्यास १५ मिनिटात हे पथक मदतीसाठी उपलब्ध होईल. दरम्यान ग्रामपंचायत ने १ एकर गायरान पेट्रोल पंपाजवळ जागा दिल्यास तिथे आपण चौकी उभारू शकतो, जेणेकरून पोलिसांना रस्त्यावर जागा मिळाल्याने कारवाई ला कमी वेळ लागेल.

यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी श्री साळुंखे यांनी या कार्यक्रमास धावती भेट दिली.

ग्रामपंचायत चे उपसरपंच सयाजी निकम, विद्यमान सदस्य सुरेश नारकर, माजी सदस्य विद्यानंद यादव, व्यापारी असोसिएशन पदाधिकारी दत्तात्रय यादव, राजेंद्र निकम, दिपक साडविलकर, शरद बाऊचकर, दत्तात्रय शेळके, रवींद्र पाटील, चंद्रप्रकाश पाटील, श्री बुवा, सुरेश म्हाऊटकर, राहुल बंडगर, रा.ज. शित्तुरकर, पोलीस पाटील संजय कांबळे,व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बांबवडे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन पांढरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.