घरगुती गणपती विसर्जनावेळी मधमाशांच्या हल्ल्यात सुमारे ५० ते ६० लोक जखमी : सुपात्रे येथील घटना
बांबवडे प्रतिनिधी : सुपात्रे तालुका शाहुवाडी इथं घरगुती गणरायांना निरोप देत असताना, मधमाशांचे मोहोळ उठले, या हल्ल्यात सुमारे ५० ते ६० जण जखमी झाले. त्यांना बांबवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले . यावेळी खऱ्या अर्थाने लोकप्रतीनिधीत्वाची जबाबदारी ” आपलं माणूस ” ठरलेले जिल्हा परिषद सदस्य विजयराव बोरगे यांनी आपली जबाबदारी चोख पार पाडली. तसेच खऱ्या अर्थाने प्रशासकीय जबाबदारी शाहुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. महेश मदने आणि सहकारी यांनी पार पाडली. अशी प्राथमिक माहिती आहे.


घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मधमाशांनी केलेल्या हल्ल्यामध्ये गावातील लहान बालके व महिला सापडल्या. तसेच काही पुरुष मंडळींना सुद्धा मधमाशांनी आपले लक्ष्य केले. या घटनेत सुमारे ५० ते ६० जणांना मधमाशा चावल्यामुळे त्यांना बांबवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. काहींना उपचार करून घरी पाठविण्यात आले, तर काहींना दाखल करून ठेवण्यात आले आहे.


दरम्यान आज घरगुती गणपती विसर्जन सोहळा असून, सुपात्रे गावच्या वरच्या दिशेला असलेल्या तलावामध्ये प्रथेप्रमाणे गणपतींचे विसर्जन केले जाते. त्याचं प्रथेप्रमाणे यंदा देखील विसर्जन होत होते. परंतु लहान मुलांनी फटाके लावले , त्यापैकी एखादी ठिणगी मधमाशांच्या पोळ्याला लागली असावी. त्यामुळे मधमाशांचे मोहोळ उठले, आणि त्यांनी परिसरात असलेल्या लोकांचा चावा घेतला. यामध्ये लहान मुले सर्वाधिक जखमी झाली आहेत. सध्या कोणतीही गंभीर घटना नसली, तरी परिस्थितीवर पोलीस निरीक्षक विजय पाटील, तसेच जि.प. स. विजयराव बोरगे लक्ष ठेवून आहेत.

यावेळी जखमी बालके, महिला, पुरुष मंडळींना बांबवडे आरोग्य केंद्रात दाखल करण्यासाठी वाहनांची सोय जि.प.सदस्य विजयराव बोरगे यांनी केली. तसेच त्यांना जागेवरून आणण्यापासून ते दवाखान्यात दाखल करेपर्यंत सर्व जबाबदारी श्री बोरगे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पार पाडली. तसेच पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्यासहित पोलीस कर्मचारी बाबासाहेब खुटाळे, शरद चिले, व अन्य पोलीस कर्मचारी मंडळी उपस्थित होती.