शिराळ्यात १७ प्रभागांसाठी ८७ % मतदान :मतदान प्रक्रिया तणावपूर्ण पण शांततेत
शिराळा( प्रतिनिधी ): शिराळा नगरपंचायतीच्या १७ प्रभागासाठी अत्यंत चुरशीने झालेल्या तिरंगी लढतीत ८७ टक्के मतदान झाले. हे मतदान तणावपूर्ण वातावरणात अत्यंत शांततेत पार पडले. प्रभाग १७ मध्ये सर्वाधिक ९४.२१ तर प्रभाग ३ व९ मध्ये सर्वात कमी व समान ८०.०३ टक्के मतदान झाले. १०५१३ मतदारांपैकी ९२०० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
सकाळी साडे सात पासून मतदानास सुरुवात झाली. सकाळी साडे सात ते साडे नऊ पर्यंत २१.४६ टक्के मतदान झाले होते. त्यावेळी सर्वाधिक प्रभाग १७ मध्ये ३६.३६ टक्के तर सर्वात कमी प्रभाग ११ मध्ये ११.३४ टक्के मतदान झाले होते. दुपारी दीड पर्यंत ६५.०४ टक्के मतदान झाले होते. प्रभाग १७ मध्ये सर्वाधिक ८२.६४ टक्के तर प्रभाग ३ मध्ये सर्वात कमी ५४.४३ टक्के मतदान झाले होते.
प्रभाग १७ हा मतदानाच्या शेवट पर्यंत टक्केवारीत सर्वात पुढे होता.
शिराळा नगर पंचायतीची ही पहिलीच निवडणूक असून, येथे काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप अशी तिरंगी लढत झाली. त्यामुळे अत्यंत चुरशीने व खेळीमेळीच्या वातावरणात मतदान पार पडून शिराळकरांनी एक वेगळा आदर्श घालून दिला आहे.
सकाळ पासून मतदान केंद्रावर मतदारांच्या रंगा लागल्या होत्या. दुपारी उन्हाचा तडाखा असल्याने मतदानाचा वेग थोडा मंदावला होता. सायंकाळ पासून पुन्हा मतदानाचा वेग वाढला. एकास एक लढत असल्याने उमेदवारांनी आपापल्या प्रभागातील मतदारांना शोधून मतदानास आणले. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढण्यास मदत झाली. मतदारांसाठी खाजगी वाहनांची सोया करण्यात आली होती.
दरम्यान दुपारी निरीक्षक संजयसिंह चव्हाण, प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार दीपक शिंदे, मुख्याधिकारी अशोक कुंभार,सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे यांनी मतदान केंद्रांना भेटी देऊ पाहणी केली.
माजी आमदार मानसिंगराव नाईक, सत्यजित देशमुख, उदयसिंगराव नाईक, भगतसिंग नाईक, अमरसिंह नाईक, राजेंद्रसिंह नाईक, रणजितसिंह नाईक, रणधीर नाईक, विराज नाईक, वीरेंद्रसिंह नाईक यांनी मतदान केंद्रास भेट दिली.
प्रभागनिहाय झालेले एकूण मतदान व कंसात टक्केवारी अशी
प्रभाग १ मध्ये ४३२ (९२.५१)
प्रभाग २ मध्ये ६५२ (९२.७५)
प्रभाग ३ मध्ये ४९७ (८०.०३)
प्रभाग ४ मध्ये ४३२ (८६.९२)
प्रभाग ५ मध्ये ७१९ (८८.६६)
प्रभाग ६ मध्ये ६४७ (८९.८६)
प्रभाग ७ मध्ये ५०३ (८९.९८)
प्रभाग ८ मध्ये ५८१ (८८.१६)
प्रभाग ९ मध्ये ५६९ (८०.०३)
प्रभाग १० मध्ये ७३९ (८२.५७)
प्रभाग ११ मध्ये ४२४ ( ८७.४२)
प्रभाग १२ मध्ये ४६० (८७.२९)
प्रभाग १३ मध्ये ४७० (८९.०२)
प्रभाग १४ मध्ये ६७१ (८९.७१)
प्रभाग १५ मध्ये ५१५(८६.७०)
प्रभाग १६ मध्ये ६६१ (८८.६१)
प्रभाग १७ मध्ये २२८ (९४.२१)
एकूण मतदान ९२०० (८७.५१) टक्के मतदान झाले.