जिल्हा बँकेची निवडणूक आणि रणनीती शाहुवाडी तालुक्यात गाजणार
बांबवडे : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यात जिल्हा बँकेच्या येवू घातलेल्या निवडणुकांची जोरदार चर्चा सुरु आहे. गत निवडणुकीत निसटता पराभव झाल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस चे राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष श्री मानसिंगराव गायकवाड (दादा ) चांगलेच दुखावले गेले होते. या निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाचे सर्जेराव पाटील पेरीडकर (दादा ) यांचा विजय झाला होता. म्हणूनच आगामी जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा बिगुल अप्रत्यक्षपणे तालुक्यात वाजला आहे.

सध्या येवू घातलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक कोल्हापूर ची निवडणूक तोंडावर येत आहे. जरी कार्यक्रम जाहीर झाला नसला तरी, सर्वच पक्षांनी आप-आपले ठराव गोळा करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष श्री मानसिंगराव गायकवाड दादा हे मागील पराभवाचे उट्टे काढण्यास आतुर आहेत. तर गेल्यावेळी आपल्याला मिळालेला विजय हा निसटता होता, याची जाणीव संचालक सर्जेराव पाटील पेरीडकर दादा यांना निश्चित आहे. यासाठी या निवडणुकीत कोणती शक्कल वापरावी, जेणेकरून विजय पूर्णत: आपल्याच पदरात पडेल, याची जुळणी ते करीत आहेत.
दरम्यान मागील निवडणुकीत मानसिंगराव गायकवाड यांना तत्कालीन आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांनी उघड उघड सहकार्य केले होते. तर सर्जेराव पाटील पेरीडकर यांना कर्णसिंह गायकवाड गटाने सहकार्य केले होते. एकंदरीत मागील निवडणुकीत चुलत्याला पुतण्यानेच विरोध केला होता.

दरम्यान सध्याची समीकरणे काही अंशी बदलली आहेत. नुकत्याच झालेल्या गोकुळ च्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा धर्म पाळीत चुलत्याने पुतण्याला सहकार्य केले आहे. तसेच जनसुराज्य शक्ती चे आमदार विनय कोरे यांनी देखील कर्णसिंह यांचे नाव पुढे करीत त्यांना सहकार्य केले आहे. इथून पुढे राजकारणाची समीकरणे कशी जुळतात, हे पाहणे गरजेचे आहे.

कारण मानसिंगराव गायकवाड हे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सेवा संस्था गटातून उभे राहणार, हि काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. यावेळी देखील मानसिंगराव गायकवाड ठराव गोळा करण्यात आघाडीवर असतील. गतवेळी झालेल्या चुका त्यांनी यावेळी टाळल्या असतील. परंतु मागील वेळी झालेला अति आत्मविश्वास यावेळी असणार नाही. यावेळी रणनीती बदललेली असेल. हे जरी खरे असले, तरी, यावेळी सर्जेराव यांची उमेदवारी असेल का ? कि, त्यांच्या जागेवर दुसरा उमेदवार असेल? या प्रश्नांची उत्तरे अद्याप अनुत्तरीत आहेत. परंतु सर्जेराव पाटील यांची उमेदवारी जर निश्चित असेल, तर ते सर्व ताकदीनिशी या निवडणुकीत उतरणार, यात शंका नाही. त्यांच्या पाठीशी कोण असेल, नसेल हा भाग नंतरचा, पण निवडणूक जिंकण्याच्या इराद्याने ते उतरली, यात शंका नाही.

यासाठी मानसिंगराव गायकवाड गट व त्यांच्यासोबत येणार असलेली महाविकास आघाडी यांनी प्रामाणिकपणे त्यांचे काम करतील, अशी अपेक्षा मानसिंगराव दादा यांना असेल. तसेच त्यांची दुसरी फळी सुद्धा कार्यरत असणार आहे. कारण यावेळी कोणताही धोका पत्करण्यास ते तयार नाहीत, असे त्यांच्या एकूण कामकाजावरून दिसत आहे. भविष्यात राजकारणात काहीही होवू शकते, हे जरी खरं असलं, तरी जिल्हा बँकेची निवडणूक यावेळी गाजणार यात शंका नाही.