जीवन असं जगावं, हसंत हसंत , गाणं म्हणंत – श्री संपत पाटील
बांबवडे : ” जीवन असं जगावं, हसंत हसंत , गाणं म्हणंत. ” हि गोष्ट आहे, शाहुवाडी तालुक्यातील एका छोट्याशा गावातील. एकीकडे तरुण वर्ग नोकरी नाही, म्हणून स्वत:ला अथवा प्रशासनाला दोष देत असतात. तर दुसरीकडे असा एक वर्ग आहे, जो स्वत:च्या हिमतीवर उद्योग उभारून, आत्मनिर्भर बनतो. अशाच एका तरुणाची हि वास्तवता आहे.

शिंपे तालुका शाहुवाडी येथील संपत आनंदा पाटील हा युवक सुद्धा सुरुवातीला नोकरीसाठी प्रयत्नात होता. परंतु सध्याची नोकरीची स्थिती तशी नाही. परंतु हा तरुण निराश झाला नाही. आपल्या वडिलांनी केलेल्या शेतीत लक्ष घालू लागला. त्याने शेतीला जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय त्याने सुरु केला. दोन म्हैशी ,व गायी यांच्या माध्यमातून तो दुध संकलित करू लागला. जनावरांसाठी लागणारा चारा, वैरण त्याने आपल्याच शेतातून निर्माण केला. कुठेही गेलो, तरी कष्ट हे करावेच लागतात. याच अनुषंगाने त्याने आपल्या शेतात हत्ती गवत लावले, बांधावर शेवगा लावला. या माध्यमातून त्याने आपल्या जनावरांसाठी चारा निर्माण केला.

शेतातच छोटे शेततळे निर्माण करून पाण्याचा प्रश्न मिटवला. या दुधाच्या जनावरांद्वारे संपत आता प्रति दिन ७० लिटर दुध संकलित करतात. याचबरोबर त्यांनी आता कुकुटपालन आणि शेळी पालन सुरु केले आहे. त्यांच्याकडे आता सुमारे १५० कोंबड्यांची पिल्ले आहेत. यासाठी त्यांनी शेड देखील मारले आहे. याचबरोबर शेळीपालन सुद्धा सुरु केले आहे.

एकंदरीत काय शेती हा तोट्याचा व्यवसाय आहे, असे बरेच जणांचे म्हणणे असते, त्याला या तरुणाने छेद दिला आहे. शेती आणि पशुपालनाचे जोडधंदे उभारून, संपत चे कुटुंब महिन्याकाठी ५६ हजार रुपये रोख मिळवतात.

त्यांच्या या शेती आणि पशुपालनाचे व्यवसाय पाहून त्यांना जिल्हा परिषदेचा आदर्श गोठा पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच श्री वारणा सहकारी दुध उत्पादक प्रक्रिया संघ यांच्या वतीने२०१८ साली ” आदर्श मुक्त संचार गोठा ” या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांक मिळवला आहे. तसेच ” सतेज कृषी प्रदर्शन २०१९ ” मध्ये ” सतेज कृषिरत्न २०१९ ” हा पुरस्कार मिळाला आहे.तसेच पशु संवर्धन विभाग जिल्हा परिषद २०२० चा ” आदर्श गोठा पुरस्कार ” सुद्धा मिळाला आहे.

एकंदरीत काय तरुणांनी निराश न होता, येईल त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी पुढे आले पाहिजे. दुसऱ्यांकडे पाच ते दहा हजार रुपये पगारासाठी रात्रंदिवस राबतात. त्यांनी तेच कष्ट आपल्या शेतात केले तर नक्कीच ते घरात राहून आपल्या गरजेचे रुपये मिळवू शकतील.
इथं फक्त जिद्द, चिकाटी आणि कष्टाची गरज आहे. असेही शिंपे गावचे तरुण संपत पाटील यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.