शिवसेने कडून कोडोली उपजिल्हा रुग्णालयावर मोर्चा
कोडोली प्रतिनिधी:-
कोडोली ता.पन्हाळा येथील उपजिल्हा रुग्णालयावर रुग्णांना सेवा व्यवस्थितरीत्या मिळण्याबाबत, शिवसेना व युवासेना कडून मोर्चा काढण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय कोडोली येथील असून, कोडोली तसेच कोडोलीच्या आसपासच्या खेड्यातील, ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता उपजिल्हा रुग्णालयावर अवलंबून आहे. तसेच गरोदर महिलांना उपजिल्हा रुग्णालयात सेवा व्यवस्थित मिळत नसल्याने, त्यांना सी.पी.आर कोल्हापूर या ठिकाणी पाठवून त्यांची गैर सोय करत आहेत. त्यामुळे गोर -गरीब व सर्व सामान्य जनतेला याचा त्रास होत आहे.
तसेच शासना कडून आलेल्या योजनेचा कोणताही लाभ गरोदर महिलांना दिला जात नाही. अपघात झाला किंवा गरोदर महिलेच्या प्रसुतीवेळी कोणतेही डॉक्टर उपस्थित नसतात. याची लवकरात लवकर व्यवस्था व्हावी, याबाबतचे निवेदन कोडोली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक आर.आर.शेट्ये यांना आज शिवसेना व युवा सेना यांच्या कडून देण्यात आले. जनतेला होणारा त्रास लवकर कमी करून सहकार्य करावे, नाहीतर शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा इशारा ही शिवसेने कडून देण्यात आला आहे.
यावेळी शिवसेना शहर अध्यक्ष मोहन पाटील, युवासेना शहर अध्यक्ष नितीन माने, शिवसेना ग्राहक कक्षाचे संतोष जाधव, विभाग प्रमुख अजित पाटील, पन्हाळा तालुका प्रमुख महिला आघाडी दीप्ती कोळेकर, सुनीता लोखंडे तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.