ज्या खतांच्या दरांनी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले त्यावर पंतप्रधानांचा फोटो,हे दुर्दैव – श्री राजू शेट्टी
बांबवडे : मतदारांच्या हातात दगड न देता पेन देवू,असे म्हणणारे मतदारसंघातून च गायब झाले. २००९ ते २०१९ पर्यंत ऊसाचा दर दहा पट शेतकऱ्यांसाठी वाढवून घेतला. परंतु विद्यमान खासदारांच्या काळात फक्त दोनशे रुपयांचीच वाढ झाली. ज्या रासायनिक खतांच्या किमती गगनाला भिडल्या, त्या खतांच्या पोत्यावर पंतप्रधानांचा फोटो मिरवला जात आहे. हे केवढे मोठे दुर्दैव आहे. असा घणाघात माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.
सातवे तालुका पन्हाळा इथं प्रचार सभा संपन्न झाली. यावेळी अध्यक्ष स्थानावरून माजी खासदार राजू शेट्टी बोलत होते. ते पुढे म्हणाले कि, एकीकडे पोत्यामागे दोनशे ते तीनशे रुपये रासायनिक खतांचे दर वाढले आहेत, तर पेट्रोल आणि डीझेल चे दर सातत्याने वाढत असल्याने शेतकऱ्यांच्या शेतमालाचा उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे शेतकरी अडचणीत येत आहे.
यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील म्हणाले कि, विरोधकांनी आमच्या नेत्यांना महाभारतातील अभिमन्यू प्रमाणे अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु त्यांना हे माहित नाही कि, हे अभिमन्यू महाभारतातील नसून, कलियुगातील आहेत. इथं अभिमान्युला चक्रव्यूहातून कसे बाहेर पडायचे, हे अगोदरच जनतारूपी श्रीकृष्णाने सांगून ठेवले आहे. त्यामुळे हातकणंगले तील महाभारतातील युद्ध आम्हीच जिंकणार यात शंका नाही विद्यमान खासदार यांनी आठ हजार दोनशे कोटी रुपयांची विकासकामे केली असा डांगोरा पिटत आहेत. परंतु खऱ्या अर्थाने त्यांनी विकास केला तो त्या विकासकामांवर मिळणारे कमिशन मिळवून स्वत:चा च विकास केला .
यावेळी राज्य सचिव राजेंद्र गड्ड्यानवार, जिल्हा अध्यक्ष वैभव कांबळे, विक्रम पाटील, मानसिंग पाटील, यांनी मनोगते व्यक्त केलीत. तसेच कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.