झाडावर अडकलेल्या १६ वानरांची वन विभागाच्यावतीने सुटका : वन विभागाचे कौतुक
बांबवडे विशेष ( रोहित पास्ते ) : थेरगाव तालुका शाहुवाडी इथं कडवी नदीला आलेल्या पुरामुळे अनेक वानरे झाडावर अडकली होती. या वानरांना वाचवण्यात बांबवडे पंचक्रोशीतील वनविभागाला यश आले आहे. या मोहिमेत वानरांच्या पिल्लांसह १६ वानरांना वाचवले गेले आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी कि, गेले पाच ते सहा दिवस शाहुवाडी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे तालुक्यातील कडवी, वारणा आदी नद्यांना पूर आला आहे. कडवी नदीला पूर आल्यामुळे थेरगाव येथील नदीजवळ असलेल्या झाडांवर गेले तीन दिवस ही वानरे अडकून पडली होती. हि गोष्ट थेरगाव येथील सुरज निळकंठ, शिवाजी निळकंठ, व अजित पाटील यांच्या निदर्शनास आली. याबाबत ची माहिती या मंडळींनी बांबवडे येथील वनविभागाला दिली.

हि माहिती कळताच,वनरक्षक रुपाली पाटील, वनसेवक शंकर लव्हटे, महिपती कुडीलेकर, व प्राणीमित्र किरण खोत यांच्या अथक प्रयत्नानंतर १६ वानरांना त्यांच्या पिल्लांसहित वाचविण्यात वनविभागाला यश आले.

ग्रामस्थांकडून या वन कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यात आले. यामध्ये भाजप चे तालुकाध्यक्ष विजय रेडेकर यांच्यासहित ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ या सर्वानीच या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.