टॉयलेट्स सुद्धा न उभारणारी सत्ताधारी चांडाळ चौकडी विकास काय करणार – समरजीतसिंग घाटगे
बांबवडे : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये जी सत्ताधारी गेली २५ वर्षे खुर्च्यांना चिकटून बसली आहेत, त्यांनी गेल्या २५ वर्षात शेतकऱ्यांना साधी टॉयलेट्स पुरवलेली नाहीत. पिण्याच्या पाण्याची साधी सोय करता आलेली नाही. शेतकऱ्यांसाठी जेवणाची, निवासाची सोय या मंडळींना करता आलेली नाही. आणि आज हि मंडळी विकासाच्या गप्पा निवडणुकीच्या तोंडावर मारत आहेत. परंतु शेतकरी आत्ता सुधारलेला आहे. त्याला हि सोंग कळतात. तेंव्हा सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करू नये, असे मत समरजीतसिंग घाटगे यांनी व्यक्त केले .

बांबवडे तालुका शाहुवाडी येथे कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती च्या प्रचार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

बांबवडे इथं शिवशाहू शेतकरी परिवर्तन आघाडी चा प्रचार शुभारंभाचा मेळावा संपन्न झाला. यावेळी श्री घाटगे अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक माजी सभापती एन.डी. पाटील सावेकर यांनी केले.

ते पुढे म्हणाले कि, ज्या सत्ताधारी मंडळींनी बाजार समिती मध्ये माल विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना अंघोळीसाठी पाणी पुरवता आलेले नाही, त्यांनी शेतकऱ्यांच्या विकासाच्या गप्पा मारू नयेत. आज जे सत्ताधारी म्हणून बसले आहेत, ते केवळ आमच्या पूर्वी दिलेल्या पाठिंब्यामुळे आहेत. जे प्रस्थापित आम्ही दिलेल्या पाठिंब्यामुळे सत्ता चालवीत आहेत, त्यांनी शेतकऱ्यांची चेष्टाच केली आहे. एकीकडे निवडणूक बिनविरोध करू, असे म्हणत इतरांना गाफील ठेवण्याचा प्रयत्न केला, पण आज आम्ही त्यांच्या विरोधात एक सक्षम पर्याय केवळ सत्यजित पाटील आबा यांच्यामुळे ठेवू शकलो आहोत. आम्ही सहकारी संस्था चालविल्या असून, त्या शाबूत ठेवल्या आहेत. आम्ही कोणाच्याही संस्था काबीज करून सहकार चालविलेला नाही. सुमारे २५ ते ३३ % सबसिडी असूनही, शेतकऱ्यांसाठी यांनी कोल्ड स्टोरेज उभे केलेले नाही. भविष्यात आमची सत्ता आल्यास प्रथम विकासाचे ते काम करणार आहोत. कारण शेतकऱ्यांचा नाशवंत माल टिकला पाहिजे. हि आमची भूमिका आहे.

दरम्यान आम्ही मलकापूर येथे उपबाजार पेठ निर्माण करून शेतकऱ्यांचा वाहतुकीचा खर्च आम्ही वाचवणार आहोत. तसेच बाजार समिती च्या माध्यमातून सीएनजी पंप सुरु करणार आहोत. आम्ही आमचा शब्द पाळला नाही, तर भविष्यात तुमच्या समोर मते मागायला येणार नाही. असे हि श्री समरजीतसिंग घाटगे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी कुंभी कासारी साखर कारखान्याचे चेअरमन चंद्रदीप नरके म्हणाले कि, आमची सत्ता आल्यास सर्वप्रथम या बाजारसमिती चे नाव बदलून राजर्षी शाहू महाराज कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती असे करून, ज्यांनी दूरदृष्टीने विकास केला, त्या छत्रपती शाहू महाराजांना या माध्यमातून मानवंदना देणार आहोत. असे न झाल्यास पुन्हा मते मागायला येणार नाही, असेही श्री चंद्रदीप नरके यांनी यांनी यावेळी सांगितले. केवळ राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी ज्या सावकरांनी निवडणूक लावली, त्यांना खऱ्या अर्थाने हि ऐतिहासिक निवडणूक करून दाखवू. या बाजार समिती मध्ये कोल्ड स्टोरेज निर्माण करून, शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने सुविधा देणार आहोत. बाजार समिती च्या नावे असलेली १२ एकर जागा कार्यान्वित करून, त्या माध्यमातून समितीसाठी कोट्यावधीचे उत्पन्न मिळवून देणार आहोत, असे न झाल्यास मते मागायला पुन्हा येणार नाही, असेही श्री चंद्रदीप नरके यांनी यावेळी सांगितले.

यावेळी माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर म्हणाले कि, निवडणुकीत कोणाला निवडून आणायचे आणि कोणाला पाडायचे अशा विकृत मनोवृत्तीला सत्तेतून पायउतार करण्यासाठी गट तट सोडून एकत्र येण्याची काळाची गरज आहे. कोल्हापुरातील प्रस्थापित संस्थानिक सर्वसामान्य वर्गाला डावलीत आहेत. आजवर सत्तेत असलेल्या चांडाळ चौकडीने केवळ विधानसभेचे राजकारण जपण्यासाठी गेली २५ वर्षे शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे.त्यांना बाजार समितीमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय करता आलेली नाही, निवासासाठी सोय नाही, आंघोळीसाठी जागा आणि पाणी नाही, कोल्ड स्टोरेज ची मागणी गेली अनेक वर्षे धूळखात पडली आहे. अशा अनेक मागण्या बाकी आहेत. या चांडाळ चौकडी ने केवळ संचालकांवर वर्चस्व गाजवून आपल्या पापाचे खापर संचालकांवर फोडले आहे. परंतु आम्ही आत्ता खऱ्या अर्थाने बळीराजा ला राजा बनविण्याचा विडा उचलला आहे. असे मत माजी आमदार सत्यजित पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, अजित पाटील, उत्तम कांबळे, आदी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केलीत.
यावेळी उत्तम कांबळे यांनी नाव न घेता कागल चे अलिबाबा, म्हणून हसन मुश्रीफ यांच्यावर तर पन्हाळ्याचे मोगँबो म्हणून विद्यमान आमदार डॉ. विनय कोरे यांच्यावर टीका केली.

या कार्यक्रमास युवराज पाटील, अजित नरके गोकुळ संचालक, हंबीरराव पाटील, पांडुरंग पाटील, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, के. एन. लाड, जालिंदर पाटील, सुरेश पारळे, नामदेव गिरी, भीमराव पाटील सोंडोली, विजय खोत, सर्जेराव पाटील मानकर, व कार्यकर्ते उपस्थित होते.