तालुक्यातील सर्वच हिरकणीं ना विनम्र अभिवादन आणि महिला दिनाच्या शुभेच्छा
शाहुवाडी : शाहुवाडी तालुक्याला ऐतिहासिक परंपरा आहे. याच तालुक्यात स्वराज्य स्थापनेसाठी रक्तरंजित इतिहास घडला. इथल्या मातीने खऱ्या मर्दाची रग पाहिली. इथल्या निसर्गाने समर्पण काय असते, ते इथे बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानाने पाहिले. तर शिवा काशीद सारख्या मावळ्या चे शौर्य पाहिले. याच इतिहासाच्या नाळेने रायगडावरील हिरकणी ची जिद्द देखील अनुभवली. आज महिला दिन आहे, याचे औचित्य साधून, या शाहुवाडी तालुक्यातील महिला ‘ हिरकणी ‘ म्हणून जेंव्हा उतरतात, तेंव्हा त्यादेखील आपल्या कर्तुत्वाचे झेंडे फडकावतात, याचे उदाहरण आपण तालुक्यातील राजकीय पटलावर ज्यांनी आपला ठसा उमटवला, त्यांचा एक प्रकाशझोत.

शाहुवाडी पंचायत समिती च्या सभापती पदी काही महिलांनाच संधी मिळाली. त्यापैकी राजश्री गद्रे वहिनीसाहेब, भाग्याश्रीदेवी गायकवाड वहिनीसाहेब, प्रभावती पोतदार वहिनीसाहेब, डॉ. स्नेहां जाधव वहिनीसाहेब, सुनीताताई पारळे वहिनीसाहेब. यापैकी बऱ्याच महिलांनी आपली कारकीर्द गाजवली.

भाग्याश्रीदेवी गायकवाड वहिनीसाहेब यांनी जिल्हा परिषद शाळांना नवी उभारी देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर दुर्गम भागात नळ पाणी पुरवठा योजना कशा राबविल्या जातील, याकडे त्यांनी जातीनिशी लक्ष दिले. शिक्षण विभागाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, याची जाणीव त्यांनी जिल्हा परिषद मधील सर्व साधारण सभेत करून दिली.

त्याचबरोबर सौ प्रभावती पोतदार वहिनीसाहेब यांनीदेखील शिक्षण विभाग कसा सर्वोत्तम होईल, याकडे लक्ष पुरविले. खऱ्या अर्थाने अनेक शाळांना वयैक्तिक भेटी दिल्या. तिथल्या उणीवा जाणून घेवून , त्या पुऱ्या करण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला. याचबरोबर तालुक्यातील वीज व्यवस्थेवर देखील त्यांनी लक्ष दिले. बांधकाम विभाग आणि पाणी पुरवठा विभाग देखील त्यांनी पाहिला, आणि घरोघरी नळ पाणीपुरवठा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

यानंतर डॉ. स्नेहा जाधव यांनी देखील आपल्या सभापती पदाच्या कारकिर्दीत आरोग्य विभागाकडे लक्ष दिले. त्या स्वत: डॉक्टर असल्याने विज्ञानाच्या सोबत ग्रामीण समाज देखील त्यांनी अनुभवला. या समाजा मध्ये अमुलाग्र बदल घडविण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्याचबरोबर तालुक्यातील अनेक विभागांकडे त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष दिले, आणि तालुक्यातील जनतेला शासनाच्या अनेक योजना जनतेपर्यंत कशा पोहचतील, याचा पुरेपूर प्रयत्न केला. अनेक विभागातील उणीवा दूर करण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढले, आणि दुर्गम भागातील जनतेला सुविधा पुरविण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

अशा अनेक हिरकणी या तालुक्यातील जनतेने अनुभवल्या आहेत. यामध्ये माजी आमदार संजीवानिदेवी गायकवाड, माजी महिला व बालकल्याण सभापती सौ शैलजादेवी गायकवाड, गोकुळ च्या विद्यमान संचालिका सौ अनुराधाताई पाटील, माजी जि.प.सदस्या सौ लक्ष्मीताई हंबीरराव पाटील, विद्यमान जि.प.सदस्या सौ आकांक्षा अमरसिंह पाटील, अशा अनेक हिरकणी या तालुक्याने अनुभवल्या आहेत. इथे सर्वच हिरकणीं ची नावे जागेअभावी प्रसिद्ध करता येत नाही. पण अशा सर्वच हिरकणी ना महिला दिनाच्या लाख लाख शुभेच्छा…आणि अभिनंदन सुद्धा.