तालुक्यात शिवसेना १३, जनसुराज्य ८, तर आघाडी ११, पेरीड निरंक : उत्तर भागात शिवसेना
शाहुवाडी प्रतिनिधी : शाहुवाडी तालुक्यात ४१ पैकी निवडणूक लागलेल्या ३३ गावांपैकी बहुतांश गावांवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. यापैकी तालुक्याच्या उत्तर भागात म्हणजेच कानसा-वारणा खोऱ्यात शिवसेनेने बाजी मारली आहे.


माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर गटाकडे एकूण १३ ग्रामपंचायती आल्या, तर जनसुराज्य शक्ती पक्षाकडे ८ ग्रामपंचायती आल्या,तर स्थानिक आघाडी ला ११ जागा मिळाल्या असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. अद्याप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अधिकृत घोषणा केलेली नाही.


शाहुवाडी तालुक्यात एकूण ४१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. दरम्यान ८ ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात आल्या,तर ३३ ग्रामपंचायती च्या निवडणुका लागल्या. दरम्यान पेरीड ग्रामपंचायत मध्ये एका जागेसाठी निवडणूक लागली होती. परंतु गावाची बिनविरोध निवडणुकीची परंपरा खंडित होवू नये, म्हणून ग्रामस्थांनी स्वयंस्फुर्तीने घेतलेल्या निर्णयानुसार इथे निरंक मतदान झाले.

दरम्यान विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार एकूण ३२ गावांच्या मतमोजणीस प्रारंभ होवून, यापैकी शिवसेनेला १३, जनसुराज्य शक्ती पक्ष ८ , इतर स्थानिक आघाडी ११ असे निकाल लागल्याचे समजते. एकंदरीत माहितीनुसार तालुक्यातील निवडणुकीचा कौल सध्या तरी शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांच्याबाजूने लागला असल्याचे दिसून येत आहे.