बांबवडे त अवतरले “ यमराज ”
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यासाठी आज अक्षरश: “ यमराज ” अवतरले होते. जो कोणी घरातून बाहेर येईल, तर आपण स्वत: तुमच्या घरात येवू, असा इशारा ‘ यमराज ’ म्हणजेच संजय पाटील ( मिस्त्री ) साळशीकर यांनी दिला.
सध्या कोरोना चा विळखा जगभर पडला आहे. यातून त्याने आपल्या देशात प्रवेश केला, पर्यायाने ग्रामीण भागात देखील कोरोना ने आपला शिरकाव केला आहे. आपल्या शाहुवाडी तालुक्यात तीन कोरोनाग्रस्त आढळून आले. यापैकी उपचारानंतर दोघेजण निगेटिव्ह झाले, अजूनही एका रुग्णाचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आला आहे. त्यामुळे अजूनही आपण सावध राहणे, शासनाचे नियम पाळायचे, पोलीस कर्मचारी आरोग्य कर्मचारी यांना सर्वोतोपरी सहकार्य करणे गरजेचे आहे, असेही यमरुपी संजय पाटील यांनी समाजाला उद्देशून सांगितले.
संजय पाटील हे एक सामाजिक कार्यकर्ते असून समाजाच्या कामात ते नेहमीच पुढे असतात. पूर परिस्थितीत सुद्धा त्यांनी पूरग्रस्तांना त्यांच्या घरी जावून मदत केली होती. आत्ताच्या या कोरोना च्या पार्श्वभूमीवर गरजवंतांना त्यांनी अन्नधान्य पुरवले आहे. अशाप्रकारे सर्वच सामाजिक कामात त्यांचा नेहमीच सहभाग असतो.