भविष्यात पर्यटनाच्या माध्यमातून शिराळा रोजगार निर्मितीचे केंद्र बनेल :आमदार जयंतराव पाटील
शिराळा (प्रतिनिधी) : भविष्यात पर्यटनाच्या माध्यमातून शिराळा तालुका मोठे रोजगार व व्यवसाय निर्मितीचे केंद्र बनेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री, आमदार मा. जयंतराव पाटील यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रात शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार पुन्हा ताकदीने उभा करायचा आहे. सर्वसामान्यांच्या विचारांचे, सर्व जाती, धर्माच्या लोकांच्या प्रगती साधणारे सरकार महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
नवी मुंबई येथील शिवराज हॉल, माथाडी भवनामध्ये शिराळा मतदार संघातील मुंबईस्थित रहिवाशांच्या स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. तत्पूर्वी त्यांच्या हस्ते महापे (तुर्भे, नवी मुंबई) येथे फत्तेसिंगराव नाईक (आप्पा) सहकारी दूध उत्पादक संघ, शिराळाच्या प्रचिती पिशवीबंद दूध निर्मिती प्रकल्पाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार मा. बाळ्यामामा म्हात्रे होते. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक प्रमुख पाहुणे होते.
प्रदेशाध्यक्ष श्री. पाटील म्हणाले, सांगली जिल्ह्यातील प्रचिती दूध हा ब्रँड आता मुंबईत आला आहे. त्याला भरभरून प्रतिसाद द्यावा. मानसिंगभाऊंच्या नेतृत्वाखाली मतदार संघात चौफेर प्रगती साधली जात आहे. सर्व संस्था सक्षम आहेत व त्यामाध्यमातून मोठी रोजगार निर्मिती केली आहे. निसर्गाची मोठी देणगी शिराळा तालुक्याला लाभली आहे. येथे पर्यटनाला मोठा वाव आहे. त्या दृष्टीने आम्ही नियोजन करत आहोत. वन विभागाच्या सहभागाने पर्यटन विकसित करण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार पुन्हा ताकदीने उभा करायचा आहे. सर्वसामान्यांच्या विचारांचे, सर्व जाती, धर्माच्या लोकांच्या प्रगती साधणारे सरकार महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणावे लागेल. मला विश्वास आहे, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून येतील व सत्ता स्थापन करतील. शिराळा मतदार संघातील विकासाचा वेग असाच कायम ठेवण्यासाठी तुम्हाला मानसिंगभाऊंना विजयी करावे लागेल. त्यांच्या विजयासाठी मुंबईकरांनी झाडून मतदानाला यावे.
आमदार श्री. नाईक म्हणाले, 1995 विधानसभेपासून शिराळा मतदार संघात विकासाच्या समाजकारणाला खऱ्या अर्थाने सुरवात झाली. वाकुर्डे बुद्रूक योजना झाली. आरोग्य, वीज, शिक्षण, प्रत्येक गावाला स्वतंत्र पिण्याचे पाणी योजना, शेतीचे पाणी, वाडी, वस्तीपर्यंतचे बारमाही पक्के रस्ते झाले. ही प्रगती आपणास कायम ठेवायची आहे. राष्ट्रवादीने लोकसभेला 10 पैकी 8 जागांवर विजय मिळवला. पक्ष फुटीनंतरही कसा सावरता येतो, हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष मा. शरदचंद्र पवार व प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी दाखवून दिले आहे. प्रभावीपणे राज्यात काम केले. पक्षसंघटन मजबूत केले. आता विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहे. कार्यकर्त्यांनी कंबर कसून कामाला लागावे.
यशवंत ग्लुकोजचे अध्यक्ष रणधीर नाईक म्हणाले, फत्तेसिंगराव नाईक दूध संघाने मोठी प्रगती केली. मुंबईत येऊन स्वतःची जागा घेऊन पिशवीबंद दूध निर्मिती केंद्र सुरू केले, ही अभिमानाची बाब आहे. मतदार संघातील माणूस जरी मुंबईस्थित असला तरी, त्यांचे संपूर्ण लक्ष गावाकडे असते. मागील कुटुंबाची काळजी त्याला असते. या मंडळींची काळजी आमदार मानसिंगभाऊ व राज्यमंत्री नाईकसाहेब घेत असतात. रस्ते, पाणी, वीज, आरोग्य या मूलभूत गरजांसह सर्व प्रकारच्या सोई, सुविधा पोचविण्याचे काम झाले आहे.
युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक म्हणाले, व्यवसाय, रोजगारासाठी शिराळा तालुक्यातील लोक मुंबई, पुण्यासारख्या शहरात विस्थापित झाले आहेत. त्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. आपल्या सर्वांगीण प्रगतीसाठी आमदार मानसिंगभाऊ व माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक हे कर्तृत्वान नेतृत्व मिळाले आहे. त्यामुळे प्रत्येक गावात मोठी विकासकामे झाली आहेत. उद्योग समुहांची उभारणी झाली आहे. मोठी रोजगार निर्मिती झाली आहे. मानसिंगभाऊ लोककल्याण अभियान मार्फत वैयक्तिक लाभाच्या योजनांचा फायदा करून देण्याचे काम अतिशय चांगले काम होत आहे. आगामी निवडणुकीतील विजयासाठी तुम्हा सर्वांची साथ अशीच कायम ठेवावी.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेसचे शिराळा तालुकाध्यक्ष बी. के. नायकवडी यांनी केले. यशवंत ग्लुकोजचे संचालक प्रकाश पाटील यांच्यासह इतर मान्यवरांची भाषणे झाली. कार्यक्रमास दूध संघाचे अध्यक्ष अमरसिंह नाईक, माजी नगरसेवक नवी मुंबई महापालिका चंद्रकांतशेठ पाटील, सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस बाळासाहेब पाटील, युवा नेते भूषण नाईक, दूध संघाचे उपाध्यक्ष प्रकाश धस, पी. आर. पाटील बापू, विश्वास’चे संचालक शिवाजी पाटील, कृष्णात पाटील, प्रकाश पाटील, एन. डी. लोहार, पोपटराव जगताप, तानाजी चव्हाण, सुरेश पाटील, शिवाजी चव्हाण, युवराज पाटील, शंकर मोहिते, सुरेश रांजवण, एस. वाय. यमगर, अनिल पाटील, प्रदीप यादव, विजय गलुगडे, गणपती भालेकर, शिवाजी पाटील, सुरेश चिंचोलकर, राजू पाटील, जयसिंग पाटील, शरद जाधव, गणेश पाटील, माणिक दशवंत, तानाजी पाटील, सचिन देसाई, एम. एस. पाटील यांच्यासह शिराळा मतदार संघातील मुंबईस्थित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सम्राट नाईक युवा शक्ती व विराज नाईक युवा मंच मुंबईचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते