भोसले कुटुंबियांच्या भेटीने ” चिमुकल्या चेहऱ्यांवर स्मितहास्य फुलले…”
बांबवडे : आपली मुलं, आपल्या सर्वांनाच काळजाचा तुकडा वाटत असतो. हे जरी खरं असलं , तरी ज्या मुलांना आई-वडील नसतात, त्यांचं काय ? त्या मुलांना सुद्धा आई-वडिलांचं प्रेम मिळावं , हि आपण समाजात राहणाऱ्या मंडळींची नैतिक जबाबदारी आहे. कारण लहान मुलं निरागस असतात. अगदी जन्मत:च त्यांच्या डोक्यावरील मातृपितृ छत्र कोणत्या न कोणत्या कारणाने हिरावलेलं असतं. अशावेळी या मुलांना , आपल्या मुलांसोबत थोडं प्रेम वाटता आलं, तर निश्चितच ती बाब कौतुकास्पद ठरेल. आणि प्रेमाला भुकेल्या असलेल्या निरागस मुलांना काही काळ का होईना, मातृपितृ छत्र लाभल्याचा आनंद, त्या चिमुकल्या चेहऱ्यांवर उमटल्याशिवाय राहणार नाही. आणि हे नेमकं आपल्याच तालुक्यातील वारणा रेठरे येथील भरतराज भोसले दाम्पत्याने केलं आहे. आपल्या मुलीचा वाढदिवस त्यांनी शाहुवाडी येथील अनाथ आश्रमात साजरा केला आहे. हि बाब निश्चितच कौतुकास्पद आहे.
यावेळी भरतराज कुटुंबीयांनी या अनाथ मुलांना वस्तू भेट देवून, त्यांच्यासोबत आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा केला. समाजात हा नवा सामाजिक पायंडा घातला आहे. अनाथ मुलांना मदत करून, सामाजिक ऋणातून त्यांनी केलेलं हे काम, खऱ्या अर्थाने समाजाला दिशादर्शक होत आहे.

यापूर्वी प्रत्येक वर्षी त्यांनी अशा मुलांना दिवाळी चा फराळ, फटाके, यांचं वाटप केले होते. त्यांच्यासोबत काहीवेळ व्यतीत करून त्या मुलांना काही प्रेमाचे क्षण बहाल करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

यावेळी कु. राजमुद्रा हिच्या जन्मदिनी त्यांच्या कुटुंबियातील भरतराज भोसले, त्यांच्या पत्नी सौ. सायली भोसले, विजय भोसले, सौ. भाग्यश्री भोसले, सरिता भोसले, अमृता देशमुख, हर्षद देशमुख, मनोज व आर्यन भोसले आदी मंडळी हा वाढदिवस साजरा करण्याच्या हेतूने, शाहुवाडी येथील अनाथ आश्रमात उपस्थित होते.