बांबवडे प्राथमिक आरोग्य केंद्राचा सावळा गोंधळ : शिवसेनेचा टाळे ठोकण्याचा इशारा
बांबवडे : बांबवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात सावळा गोंधळ सुरु असून “स्वाइन फ्लू ” सारख्या रोगाची साथ सुरु असूनही आरोग्य केंद्रात फक्त दोनच कर्मचारी आज उपस्थित होते. असे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. एकंदरीत सुरु असलेला हा सावळा गोंधळ लवकरच थांबला नाही, तर शिवसेनेच्यावतीने आरोग्य केंद्रास टाळे ठोकण्यात येईल, अशा आशयाचे निवेदन येथील डॉ. निकम यांना शिवसेनेच्या वतीने देण्यात आले आहे.
बांबवडे प्राथमिक आरोग्य केंद्र महाराष्ट्रातून दुसऱ्या क्रमांकाचे आरोग्य केंद्र होते. इथं डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी वृंद अशा तऱ्हेने कार्यरत होते, कि अवघ्या महाराष्ट्राला त्यांच्या कामाची दाखल घ्यावी लागली. परंतु सद्य स्थिती मात्र नेमकी उलटी आहे. येथील डॉक्टर च प्रथम सौजन्य विसरलेले आहेत. येणाऱ्या रुग्णांशी उद्धट वर्तन, पत्रकार वर्गाला व्यवस्थित माहिती न देता संदिग्ध माहिती पुरवणे, अनेक प्रकारच्या लशींची गरज असतानाही,त्या उपलब्ध न करणे, असे अनेक प्रकार या प्राथमिक आरोग्य केंद्रात घडत आहेत.आरोग्य केंद्राभोवतीचा परिसर अस्वच्छ असून ,इंजेक्शन च्या सुया बाहेर पडलेल्या आढळून येत आहेत. सध्या या प्रकारावर शिवसेनेने आवाज उठवला असून, हे प्रकार वेळीच न थांबल्यास आरोग्य केंद्रास टाळे ठोकण्यात येईल, अशा आशयाचा इशारा देखील शिवसेनेच्यावतीने देण्यात आला आहे.
यावेळी जिल्हा उपप्रमुख नामदेव गिरी, उपतालुकाप्रमुख हरीश पाटील, बळीराम ठाणेकर, बांबवडे शहर प्रमुख सचिन मूडशिंगकर , विजय लाटकर, सारंग पाटील, दिगू पाटील, सुरेश म्हाऊटकर, शरद सुतार, संदीप पाटील, राकेश कुंभार, अभी डवंग, वैभव चव्हाण, रोहित लांडगे व शिवसैनिक उपस्थित होते.