महाराष्ट्राला वादळात दिवा लावायची सवय आहे : महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा ||
बांबवडे : आज महाराष्ट्राचा साठावा वर्धापनदिन. या साठ वर्षात या महाराष्ट्राच्या मातीने अनेक चढ-उतार पाहिलेत. हे राज्य निर्माण करण्यासाठी अनेक हुतात्म्यांनी आपल्या घरादारावर तुळशीपत्रं ठेवलीत, अनेकांचे संसार देशोधडीला लागले, आणि त्यानंतर हा मंगलमय महराष्ट्र मुक्त झाला. या महाराष्ट्राला वादळात दिवा लावायची सवय आहे. वेळ पडल्यास या महाराष्ट्रात गवतासही हौतात्म्याचे भाले फुटतील. अशा या पवित्र भूमीला या अनुषंगाने त्रिवार वंदन.
या महाराष्ट्राच्या मातीत आजदेखील तेवढेच सामर्थ्य आहे, जे महाराष्ट्र एकीकरण चळवळीत होते. आजही अनेक तरुण वेळ पडल्यास हौतात्म्य पत्करायला तेवढ्याच जिद्दीने पुढे येतील. आजचा काळ संक्रमणाचा असला, तरी आपला सेनापती मात्र लढवय्या आहे, याचे भान असू द्यावे. एकीकडे कोरोना शी दोन हात करतायत, तर दुसरीकडे सुरु असलेल्या घाणेरड्या राजकारणाला तितक्याच संयमाने सामोरे जात आहेत. तांत्रिक गोष्ट धरून त्यांना अडचणीत आणणाऱ्या मंडळींशी ते दोन हात करीत आहेत. हा महाराष्ट्र लढवय्या आहे. केवळ खुर्चीसाठी राजकारण करायचे असते, तर या अगोदर त्यांना अनेक संधी आल्या होत्या. परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, कारण माझा महाराष्ट्र अडचणीत आहे. यातून त्यांची समर्पणाची भावना दिसून येते. आज केवळ त्यांना आमदारकी मिळू नये, यासाठी अनेकांनी आपले देव पाण्यात ठेवले आहेत. परंतु सर्वसामन्य जनता मात्र त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. त्यामुळे या अडचणी दूर होतील, यात शंका नाही. या मातीच्या आशीर्वादात अजूनही तितकीच ताकद आहे, जितकी शिवरायांना या मातीने दिले होते. ज्यांना “ साहेबांनी ” बसायला जागा दिली, त्यांनी मात्र हातपाय पसरले. पाहू, भविष्यात अनेक निवडणुका होणे बाकी आहेत, एवढे मात्र या मंडळींनी ध्यानात ठेवावे, आणि जनता त्याच्या प्रतीक्षेत आहे. या महाराष्ट्राच्या लढवय्या सेनापतीला मागे खेचणाऱ्यांना भविष्यात त्याची प्रचीती आल्याशिवाय राहणार नाही.
अशा ह्या लढवय्या महाराष्ट्राचा हीरकमहोत्सव थाटामाटात होणे, अपेक्षित होते. परंतु राज्याची परिस्थिती बिकट आहे. कोरोना सारख्या गंभीर विषाणू ने इथं थैमान घातलं आहे. परंतु हे वादळ देखील निश्चित शांत होईल. आणि आपला महाराष्ट्र पुन्हा नव्या उमेदी ने उभा राहील.
सर्व महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या लाख लाख शुभेच्छा.
|| जय हिंद, जय महाराष्ट्र ||