“पोलीस”
” पोलीस ” हा शब्दच इतका वजनदार आहे कि,नाव काढताच कुठं तरी ,काही तरी होतं . या शब्दातच जरब आहे,आणि ती असायलाही हवी. कारण या मंडळींच्याच जीवावर समाज बिनधास्त पणे झोपत असतो. म्हणूनच पूर्वी आई म्हणायची “गप झोप नाहीतर, पोलिसाला बोलवेन.” हि आदरयुक्त भीती समाजाच्या मनावर खोलवर रुजलेली असायची. पण आजची घटना पोलिसांच्या इतिहासातील काळा दिवस म्हटल्यास अतिशयोक्ती होवू नये. पोलीस या शब्दाची झालेली नाचक्की निश्चितच न भरून निघणारी आहे. पैशाच्या हव्यासासाठी पोलिसांवर अनेकवेळा बोलले जाते. काही खरे,काही अधांतरी. याच्या खोलात आपल्याला जायचे नाही, पण आज सांगली गुन्हे अन्वेषण खात्याच्या घनवट आणि त्यांच्या सहकाऱ्यांमुळे गेलेली अब्रू निश्चितच पोलीस खात्याच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगल्या सारखीच आहे.
“पोलीस” हा शब्द समाजासाठी बहुमोलाचा आहे. कुणी काहीही म्हटलं तरी, पोलीस हा समाजाचा आत्मा आहे. खूप पोलीस असे आहेत कि,जे खऱ्या अर्थाने “सद्रक्षणाय आणि खलनिग्रहणाय” याची जबाबदारी सांभाळत आहेत,म्हणूनच समाज आज सुखरूप आहे. परंतु याचा अर्थ असा होत नाही कि,घनवट सारखी मंडळी स्वत: तर लोभाच्या दलदलीत धसतातंच,पण आपल्या सोबत आपल्या सहकाऱ्यांनाही घेवून बुडतात. असले अधिकारी केवळ गुन्हेगार नाहीत,तर समाजाला लागलेली वाळवी आहे. पोलीस या शब्दाकडून न्यायाची अपेक्षा असते,पण या सगळ्या महाशयांनी आपली फुगलेली पोटे केवळ भरलीच नाहीत,तर फुटेपर्यंत ठासलीत. यावर अधिक बोललो तर समाजामध्ये वाईट संदेश जाईल. यामुळे खऱ्या अर्थाने रात्रंदिवस राबणारे पोलीस बदनाम होतील.म्हणूनच या सगळ्या नतद्रष्ट अधिकारी,आणि कर्मचारी मंडळींना अधिकाधिक शिक्षा व्हावी,कारण समाजाला अजूनही खऱ्या पोलिसाची गरज आहे. अजूनही आईने आपल्या लहानग्याला दटावण्यासाठी “पोलीस” या शब्दाचा वापर आदरयुक्त भितीसाठी वापरला जावा. अशी अपेक्षा आहे.