मिंधे सरकार म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी – खासदार संजय राऊत
बांबवडे : कोल्हापूरची माती स्वाभिमानी आहे. इथं निष्ठावंतांची कमी नाही. तरीसुद्धा जागते राहो, हे सांगण्यासाठी हि शिवगर्जना मोहीम आहे. ज्यावेळी शिवसेनेच्या निष्ठावंतांचा इतिहास लिहिला जाईल, त्यावेळी तुमच्या सत्यजित आबांचं नाव तुम्हाला पहिल्या रांगेत पहायला मिळेल. कारण स्व. बाळासाहेबांनी जेंव्हा शिवसेना स्थापन केली, त्यावेळी सुद्धा बोटांवर मोजण्या इतकेच लोक होते. परंतु नंतर एक मोठा पक्ष म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात आपल्याला पहायला मिळत आहे. असे मत शिवसेनेचे खंदे समर्थक असलेले खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.


सरूड तालुका शाहुवाडी येथील ग्रामपंचायत च्या प्रांगणात संजय राऊत यांची जाहीर सभा संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी आमदार बाबासाहेब पाटील सरुडकर होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार संजय राऊत उपस्थितांना संबोधित करीत होते. यावेळी तालुक्यातील नूतन सरपंच,उपसरपंच, सदस्यांचा सत्कार सोहळा देखील यावेळी संपन्न झाला.

यावेळी श्री राऊत पुढे म्हणाले कि, आज जरी शिवसेना अडचणीत आली असली, तरी, भविष्यात जोपर्यंत सूर्य, चंद्र असतील तोपर्यंत शिवसेना राहील. त्यापैकी काही किरणे तुमच्या शाहुवाडी मधील सत्यजित आबांच्या माध्यमातून असतील. दरम्यान येत्या विधानसभा निवडणुकीत सत्यजित पाटील यांच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला आमदार द्या, आम्ही तुम्हाला नामदार देवू, यासाठी आमचे प्रयत्न असतील.

दरम्यान शिंदे सरकार वर टीका करताना श्री राऊत म्हणाले कि, शिंदे सरकार म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी आहे. आणि भाजप त्यांना मांडीवर घेवून दुध पाजत आहेत. कारण ज्यांनी तुम्हाला वाढवलं, त्यांच्या पाटीत तुम्ही खंजीर खुपसला. त्याचप्रमाणे महाराष्ट्र दिल्लीश्वरांच्या गोठ्यात बांधण्याचा तुमचा प्रयत्न आहे. एकेकाळी दिल्ली चेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, असे अभिमानाने म्हटले जायचे. परंतु सध्याचे शिंदे सरकार दिल्लीश्वरांचे खुर चाटताना दिसत आहेत.


दरम्यान निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह चाळीस चोरांना दिला. हा शिवसेनेवरील अन्याय आहे. फक्त चाळीस जणांच्या बहुमातांवर ज्यांनी निर्णय दिला. त्यांनी या शाहुवाडी मतदारसंघातील प्रतिज्ञापत्रांचा उपयोग केलेला दिसत नाही. अशाप्रकारे केवळ विधानभवनातील आमदार म्हणजे पक्ष नव्हे, तर त्यांना आमदार करणारी जनता म्हणजेच शिवसैनिक हा पक्ष आहे, हि साधी गोष्ट त्यांना पटली नाही. एकंदरीत मुस्कटदाबी करण्याचे काम भाजप च्या मदतीने झाले, आणि निवडणूक आयोगाने पक्षपाती निर्णय दिला. शिवसेना कोणाची हा प्रश्न लहान मुलाला जरी विचारला असता, तरी त्यानेही सांगितले असते कि, ठाकरे म्हणजे शिवसेना. एवढेच काय मुडद्यांना जरी विचाराल, तरी त्यांचा आत्मा सुद्धा सांगेल कि, शिवसेना ठाकरेंची च म्हणून. शिवसेना मागणे, हि साधी गोष्ट नाही. केवळ दाढी वाढवून शिवसेना सांभाळता येत नाही. तर ती ताकद रक्तातच असावी लागते. त्यामुळे हा मिंधे गट म्हणजे पावसाळ्यात येणाऱ्या गांडूळांप्रमाणे आहे, काळजी करू नका, पाऊस गेला कि, गांडूळ हि जातात.

दरम्यान आपल्या भाषणातून चौफेर टीका करताना वारणेच्या नोटांचा हि खरपूस समाचार त्यांनी घेतला.

यावेळी माजी आमदार सत्यजित पाटील यांनी सुद्धा आपल्या भाषणातून सांगितले कि, सध्या जी कामे सुरु आहेत, त्यांना उद्धव साहेबांच्या काळात मंजुरी मिळाली होती. त्याला अगोदर स्थगिती दिली आणि तीच कामे पुन्हा सुरु केली आहेत. मंजुरी आमची आणि नारळ मात्र विरोधक फोडत आहेत. भविष्यात लोकशाही टिकवायची असेल तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये मविआ चे उमेदवार निवडून आणणे हि काळाची गरज आहे, नाहीतर बेबंदशाही माजल्याशिवाय राहणार नाही. राजकारण संपलं तरी चालेल, पण उद्धव साहेबांच्या पाठीशी आपण ठाम राहणार आहोत. कारण हि शेवट ची संधी आहे, नाहीतर राज्यात हुकुमशाही आल्याशिवाय राहणार नाही. असेही श्री सत्यजित पाटील सरुडकर यांनी सांगितले.


यावेळी आपल्या भाषणातून बोलताना रणवीरसिंग गायकवाड म्हणाले कि, निवडणूक आयोगाचा निर्णय काहीही असला, तरी जनता हे आपल कोर्ट आहे. आणि ते आपल्या मविआ सोबत आहे. फक्त आम्ही तुम्हाला आमदार देतो, तुम्ही आम्हाला नामदार द्या, याचबरोबर येणाऱ्या लोकसभेसाठी उमेदवार आमच्या शाहुवाडी, आणि पन्हाळा तालुक्यातील द्या, अशी मागणी रणवीर सरकार यांनी संजय राऊत यांच्याकडे केली आहे.

दरम्यान रणवीर सरकारांच्या भाषणाचा आशय धरून सरकार, तुम्ही आम्हाला आमदार द्या, आम्ही तुम्हाला निश्चित नामदार देवू, असे आश्वासन खासदार संजय राऊत यांनी आपल्या भाषणातून बोलताना दिले.

यावेळी शिवसेनेचे जिल्हासंपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर, मुरलीधर जाधव आदी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केलीत.

कार्यक्रमास तालुका संपर्क प्रमुख आनंदराव भेडसे, जिल्हा उपप्रमुख नामदेव गिरी, माजी आरोग्य सभापती हंबीरराव पाटील, सुरेश पारळे, यांच्यासहित अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.