आम्ही रस्त्यावरची लढाई लढत राहू – खासदार राजू शेट्टी
बांबवडे :शहीद जवान श्रावण माने यांच्या स्मरणार्थ त्याठिकाणी सांकृतिक हॉल मंजूर करण्यात येणार असून सुमारे साडे सात कोटींची कामे मंजूर करण्यात आली आहेत, अशी माहिती खासदार राजू शेट्टी यांनी बोलवलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी श्री. शेट्टी म्हणाले कि, ग्रामसडक योजनेंतर्गत संशोधन आणि विकास या अंतर्गत अतिवृष्टी निधीतून सुमारे चार कोटींची रस्त्यांची कामे मंजूर केली आहेत. यामध्ये खुटाळवाडी, साळशी, भोसलेवाडी, पोवारवाडी हा सुमारे ६ किलोमीटर चा रस्ता धरण्यात आला आहे.
तसेच शाहुवाडी, म्हाळसवडे, कोळगाव, टेकोली साडेतीन किलोमीटर रस्त्यासाठी २.६४ कोटी, तसेच कांटे-बुरंबाळ हा १ किलोमीटर चा रस्ता यासाठी ८७ लाख रुपये असा खर्च अपेक्षित असून यासाठीसुद्धा मंजुरी घेण्यात आली आहे. यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे ,तसेच मुख्यमंत्री निधीतून फंड एकत्रित करण्यात आला आहे.
शेतकरी आंदोलनाविषयी पत्रकारांनी विचारले असता, मी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसोबत राहणार आहे. माझ्यासाठी शेतकरी महत्वाचे आहेत. यासाठी कुणाशीही दोन हात करण्याची माझी तयारी आहे. असा टोला त्यांनी कृषिमंत्री नाम.सदाभाऊ खोत यांचे नाव न घेता लगावला.
दरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत जागृती निर्माण करण्यासाठी किसान जागृती यात्रा संपूर्ण देशभर काढणार असून, यामध्ये सुमारे १३० शेतकरी संघटना सहभागी होत आहेत. प्रथमच संपूर्ण देशातील शेतकरी एकत्र येत आहे. या पार्श्वभूमीवर स्वामिनाथन आयोगातील शिफारस म्हणजेच शेतकऱ्याच्या उत्पादनाच्या एकूण खर्चाच्या दीडपट हमीभाव त्याला मिळाला पाहिजे, या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत.
सध्या शासन जी कर्जमाफी करण्याचा दावा करत आहे, हि केवळ फसवाफसवी असून, शेतकऱ्याच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न शासन करत आहे. तसेच ज्या शेतकरी वेळेवर कर्जफेड करत आहे, त्यांनी उर्वरित कर्ज ३० जून अखेर भरल्यानंतर च त्यांना अनुदानाची रक्कम मिळणार आहे, असा अध्यादेश जारी करत असताना, केवळ दोन दिवसांची मुदत आहे. अशावेळी वेळेवर कर्ज भरणारा शेतकरीसुद्धा अचानक उर्वरित बाकी भरू शकणार नाही. याचाच अर्थ शासनाला अनुदान द्यायचेच नाही, असा होतो. म्हणूनच शासन केवळ शेतकऱ्याच्या प्रश्नाबाबत धूळफेक करीत आहेत.
आम्ही रस्त्यावरची लढाई लढणारे कार्यकर्ते असून शेतकऱ्यासाठी शेवटपर्यंत लढत राहू. असेही राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी तालुका अध्यक्ष वसंत पाटील, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष सागर शंभू शेटे, जिल्हा उपाध्यक्ष अवधूत जानकर, तालुका उपाध्यक्ष अमर पाटील, युवा अध्यक्ष पद्मसिंह पाटील, बांबवडे शहराध्यक्ष सुरेश म्हाऊटकर, रायसिंग पाटील चरणकर ,युवा उपाध्यक्ष गुरुनाथ शिंदे, तुकाराम खुटाळे, शिवाजी पाटील सावेकर, संतोष पाटील सावे,रामभाऊ लाड वाडीचरण, अनिल पाटील डोणोली, अजित साळुंखे चरण आदि कार्यकर्ते उपस्थित होते.