मुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार ?
” जय जय महाराष्ट्र माझा “: महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
बांबवडे : आज १ मे महाराष्ट्र दिन. अवघ्या मराठी माणसांनी या महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने किंमत मिळवून दिली. ज्यांनी बलिदानाचे कारंजे उडवले मुंबईतील फ्लोरा फौंटन जवळ. जिथं एका अमराठी माणसाने दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले, आणि आमचा गिरणी कामगार या गोळ्या छातीवर झेलण्यासाठी पुढे आला. आणि बलिदानाचा वारसदार ठरला. १०६ हुतात्म्यांनी इथं हौतात्म्य पत्करलं, त्यांच्या स्मरणार्थ आजचा महाराष्ट्र दिन या नावाने पुढे आला.

म्हणूनच त्या हौतात्म्य प्राप्त झालेल्या गिरणी कामगारांना , त्या हुतात्म्यांना आजच्या ह्या महाराष्ट्र दिनानिमित्त विनम्र अभिवादन. आपण सर्व महाराष्ट्रीयन जनतेला या महाराष्ट्र दिनाच्या साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स् व एसपीएस न्यूज च्या वतीने लाख लाख शुभेच्छा.
आपला महाराष्ट्र अथांग आणि अवर्णनीय आहे. जरी आपण आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलो, तरी आपल्याकडे सुद्धा ” छपन्न इंच का सीना ” आहे. पण तो महाराष्ट्राच्या हितासाठी वापरा. आपल्या राज्यातून अनेक उच्च कार्यालये मुंबई बाहेर नेणाऱ्यांचे लांगुलचालन करण्यासाठी नको. एकेकाळी कोणी समोरासमोर मुंबई आपल्या हातातून नेण्यासाठी पुढे आला होता. त्यावेळी कमी शिकलेल्या आपल्या गिरणी कामगारांनी ती वाचवली. आणि आज त्याचीच पुनरावृत्ती होण्याची भीती वाटू लागली आहे. अशा या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या लोकांपासून सावध व्हा. आज कार्यालये मुंबई बाहेर जावू लागली आहेत, उद्या मुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार ? यासाठीच सावध राहण्याची गरज आहे.

आपलीच मराठी माणसे जर या सगळ्याला उचलू लागणार असतील, त्यासारखा देशद्रोह कोणता ? आताही वेळ आहे, अजूनही महाराष्ट्राच्या मातीसाठी पोलादी मनगटे वापरा. आणि मोठ्या अभिमानाने म्हणा ” जय जय महाराष्ट्र माझा “.