‘विश्वास ‘ मध्ये वृक्षारोपण
शिराळा : चिखली तालुका शिराळा येथे विश्वास सह. साखर कारखान्याच्या गाडी तळ परिसरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी माजी आमदार नाईक म्हणाले कि, ‘ विश्वास ‘ कारखान्याने वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन यांचे सर्व मापदंड पार केले आहेत. कारखान्याच्या परिसरात नारळ, आंबा, चिकू, आवळा, लिंब, चिंच, विविध फुलझाडे, शोभेची झाडे लावण्यात व जोपासण्यात आली आहेत. त्यामुळे कारखान्यात आलेल्याला पदोपदी सावली, व स्वच्छ हवा मिळते. वर्षभरात प्रत्येकाने एक तरी रोप लावून, त्याचे संवर्धन करून पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करावी.
यावेळी ए.एन.पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी विजयराव नलवडे, प्रवीण शेटे, विश्वास कदम ,कार्यकारी संचालक राम पाटील यांच्यासह सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते. पर्यावरण अधिकारी शरद पाटील यांनी आभार मानले.